तासवडे टोलनाका : तासवडे एमआयडीसीतील एस के एस कंपनीतील त्या दहा स्फोटांना सहा दिवस झाले आहेत. स्फोटात संपूर्ण कंपनी उद्ध्वस्त झाली असली, तरी कंपनी मालक कामानिमित्ताने युरोपमध्येच आहेत. त्यामुळे अजूनही केमिकल कसले होते? स्फोट कशामुळे झाला? साठा किती होता आणि एवढा साठा कशासाठी केला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून प्रशासनाला मिळाली नाहीत.
दरम्यान, शुक्रवारी एमआयडीसी विभागाचे डेप्युटी इंजिनिअर बी. ए. गायकवाड आणि तळबीड पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र भोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी अजूनही केमिकलचे बॅलर आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत 50 मीटर लांबूनच कंपनीची पाहणी केली. त्यामुळे स्फोटांची अजूनही एमआयडीसी परिसरात भीती कायम आहे.
सोमवारी सलग दहा स्फोट झाल्यापासून एस के एस कंपनीत आहे तीच परिस्थिती कायम आहे. त्या ठिकाणी अजूनही केमिकलचे बॅलर असून, ते बॅलर गॅसने फुगलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. प्रशासन ते केमिकल थंड होण्याची वाट पाहत आहे.
दरम्यान, कंपनी मालक सर्जेराव साळुंखे हे कंपनीत स्फोट होण्याअगोदर कामानिमित्ताने युरोपला गेले आहेत. तेही अजून आले नाहीत. त्यामुळे कोणते केमिकल आहे. याची माहिती प्रशासनाला मिळत नाही. तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, कंपनी इन्स्पेक्टर, एमआयडीसी प्रशासन आणि पोलिस हे सर्वच विभाग आपापल्या परीने स्फोटाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष कंपनीत जाऊन केमिकलची पाहणी व तपास केल्याशिवाय उत्तर मिळणे अवघड आहे.
कंपनीला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, एमआयडीसी प्रशासन, फॅक्टरी इन्स्पेक्टर यांनी केमिकलचा परवाना दिला. त्यावेळी एस के एस कंपनीला केमिकलचा वापर, साठा आणि सुरक्षा, उपाययोजना याचे कायद्यानुसार बंधन असणार. तरीही एवढे मोठे स्फोट कसे झाले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शुक्रवारी एमआयडीसी विभागाचे डेप्युटी इंजिनिअर बी. ए. गायकवाड यांनी पन्नास मीटर वरून कंपनीची पाहणी केली; मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही.