खेड : संगममाहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधिस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी केलेल्या आराखड्याचे काम मोठ्या स्वरूपाचे आहे. समाधिस्थळाचे संरक्षण, जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने व लवकर होण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही कोल्हापूरचे खा. शाहू महाराज यांनी दिली.
संगममाहुलीतील महाराणी ताराराणी यांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत होती. हा प्रश्न दै. ‘पुढारी’ने अजेंड्यावर घेत आवाज उठवला. ‘मुघलमर्दिनी महाराणी ताराराणींची समाधी उपेक्षितच’ असे वृत्त प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर या समाधिस्थळाच्या जीर्णोद्धार, संवर्धनाचा विषय शासनाच्या अजेंड्यावर आला.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मंत्री हसन मुश्रीफ यांनीही बैठका घेऊन समाधिस्थळाच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सातार्यातील संगममाहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधिस्थळाला कोल्हापूरचे खा. शाहू महाराज यांनी भेट देऊन दर्शन घेतले आणि समाधीस्थळाची पहाणी केली.
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, संजय कदम, संगममाहुलीचे सरपंच प्रविण शिंदे, प्रकाश माने, राहुल शिवनामे, चंद्रकांत कुंभार, अविनाश कोळपे, पोलीस पाटील शशिकला धोत्रे, जयवंत सपकाळ, शशिकांत सपकाळ, राजेंद्र देसाई तसेच कोल्हापूर येथील शासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. शाहू महाराज यांनी संगममाहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटानजीक कृष्णा नदीच्या पात्रातील वाळूच्या ढिगार्याखाली गेलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विधीवत पूजा केली. त्यानंतर थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर खा. शाहू महाराज यांनी आप्पासाहेब महाराज यांच्या मंदिरानजीक ठेवलेल्या महाराणी ताराराणी यांच्या वज्रलेप केलेल्या दगडी अवशेषांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी संगममाहुली येथील घाट व परिसरातील विकास आराखड्याबाबत तयार केलेल्या आराखड्याची माहिती खा. शाहू महाराज यांना दिली. त्यावेळी महाराणी ताराराणी यांच्या समाधी संवर्धनाचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे खा. शाहू महाराज यांनी सांगितले.