सातारा : कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेली दहा वर्षांच्या आतील झाडे तोडली जातील, जुनी झाडे ठेवली जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा पर्यावरणप्रेमी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी साताऱ्यात खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे म्हणजे ‘पोरांना मारायचे अन् आई बापांना ठेवायचे,’ असे आहे. मात्र आपले आई-बाप असलेल्या नाशिकच्या तपोवनातील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही, असे स्पष्ट मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात सयाजी शिंदे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गुरुवारी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी वृक्षांचे पुनर्रोपण करण्यावर भर दिला होता. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे म्हणाले, 10 वर्षांच्या आतील झाडे तोडण्याची व त्या बदल्यात दुसरी झाडे लावण्याची कल्पनाच मुळात चुकीची आहे. म्हणजे पोरांना मारायचे आणि आई-बापाला जिवंत ठेवायचे. प्रत्यक्षात त्यांचे उरलेले वय किती आहे? हे बघायचेच नाही, असे शिंदे म्हणाले.
वृक्षलागवडीबाबत कागदोपत्री सक्सेस रेट दाखवला जातो. त्याच्या तपासणीची गरज आहे. उजाड माळरानावर खड्डे तयार केले जात आहेत. त्या ठिकाणी माती चांगली तिथे पाणी चांगले नाही. पंधरा फूट उंचीची झाडे लावले जात आहेत, तेवढी झाडे खाली गेली पाहिजेत. विनाकारण खर्च नको, हीच आपली भूमिका असल्याचेही शिंदे म्हणाले.
कोणत्याही साधुसंतांचा आपण अपमान केलेला नाही. आपण कधीही जातिभेद मानत नाही. मुळात झाडं तोडणे हे साधुसंतांना मान्य आहे का? ज्याच्यापासून आपण जगतो, श्वास घेतो, अन्न, पाणी मिळते. ती झाडे तोडणेच चुकीचे आहे. मुळात झाडे आधी होती, ऋषीमुनी त्याखाली तपश्चर्या करू लागले. झाडाखालीच त्यांना प्रचिती आली हे मान्य करावे लागेल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.