सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे विचार केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जय शिवाजी, जय भारत हा उपक्रम राबवला जात आहे. महापुरूषांचा आदर्श घेत तरूण पिढीने नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणत देश पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणास्थान व दैवत होते. त्यांच्या कार्यातून ऊर्जा घेऊन आपणही देश विकासाचे कार्य पुढे नेऊया, असे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय शिवाजी, जय भारत मेगा पदयात्रा ढोल, ताशे आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि शिवमय वातावरणात सातारा शाहूनगरीत उत्साहात पार पडली. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, सातारा मुख्याधिकारी अभिजीत बापट प्रमुख उपस्थित होते.
ना. रक्षा खडसे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशभर जय शिवाजी, जय भारत मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पदयात्रेचा देशातील प्रमुख कार्यक्रम शाहूनगरीत संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वराज्याचे स्वप्न साकारले. त्यांचे विचार केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहेत. त्यांचे कार्य पुन्हा एकदा तरुण पिढीपर्यंत नेण्याचे कार्य जय भारत युवा कार्यक्रम व केंद्रीय क्रीडा मंत्रालय करत आहे. महापुरूषांचा आदर्श घेत तरुण पिढीने नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात साकार करत देश पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणास्थान व दैवत होते. त्यांच्या कार्यातून ऊर्जा घेऊन आपणही देश विकासाचे कार्य पुढे नेऊया. तरुणांनी आपले विचार, नवनवीन संकल्पना माय भारतच्या पोर्टलवरुन मांडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही मंत्री रक्षा खडसे यांनी केले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य देशातच नव्हे तर सातासमुद्रापार नेण्याचे काम होत आहे. या शाहुनगरीत जय शिवाजी, जय भारत मेगा पदयात्रेत जिल्हावासीय उत्साहाने सहभागी झाले आहेत. सामान्य रयतेचे राज्य कसे असते याचा आदर्श घालून देणारे छत्रपती शिवराय होते. जगभरात शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी कामे होत आहेत. केंद्र आणि राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर काम करत आहेत. मेगा पदयात्रेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा जागर शिवभूमी सातारा याठिकाणी होत आहे.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तसेच शिवप्रेमींच्यादृष्टीने हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. हिंदवी स्वराज्याची स्थापना, स्वधर्म, स्वराष्ट्र, राष्ट्रप्रेमाचे व राष्ट्र भक्तीचे शिक्षण यांचा आदर्श वस्तुपाठ महाराजांचे चरित्र आपल्याला घालून देते. त्यांच्या मार्गानेच देश पुढे गेला पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जय शिवाजी, जय भारत मेगा पदयात्रा कार्यक्रम सातारामध्ये होत असल्याचा आनंद आहे. देशाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. शिवाजी महाराजांनी तरुण मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशातील युवाशक्ती मजबूत करण्याचे काम करत आहेत.
दरम्यान, पोवाडे, ऐतिहासिक वेशातील मावळे, घोडे, मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी इतिहास काळ निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांची पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला झेंडा दाखवून सुरूवात झाली. यावेळी माय भारत युवा कार्यक्रमाचे राज्य निदेशक कालीदास घाटवळ, माय भारतचे क्षेत्रीय अधिकारी अजय शिंदे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी व शिवप्रेमी, नागरिक 12 हजाराहून अधिका संख्येने सहभागी झाले होते. गांधी मैदान येथून मार्गस्थ झालेल्या या मेगा पदयात्रेची सांगता शिवतीर्थ पोवई नाका येथे करण्यात आली.