सातारा

Satara News: काशीळ-कोपर्डेदरम्यानच्या पुलाचे सर्वेक्षण सुरू

कृष्णा-उरमोडी संगमावर होणार नवा सेतू : दळण-वळण सुलभ

पुढारी वृत्तसेवा

वेणेगाव : सातारा तालुक्यातील काशीळ-कोपर्डे हा परिसर आता जोडला जाणार असून कृष्णा आणि उरमोडी नदीवरील नवीन पुलाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. हा पूल लवकरच उभा राहणार असून त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम सुरु झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले व आ. मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. हा पूल झाल्यानंतर या परिसरातील दळण-वळण सोयीचे होवून पर्यटनाचे नवे दालनही खुले होणार आहे.

काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत कृष्णा आणि उरमोडी नदीचा संगम झाला आहे. या संगमावर हा नवीन पूल होणार आहे. या नव्या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्राथमिक सर्वेेक्षण हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामामुळे तारळे-पंढरपूर राज्य मार्गाला नवी चालना मिळणार असून, काशीळ, कोपर्डे, तुकाईवाडी, सायळी (पुनर्वसित), तारगाव, दुर्गळवाडी, वेणेगाव, कालगाव आदी भागातील नागरिकांना अत्यंत सोयीचा आणि आवश्यक असा हा पूल ठरणार आहे. कृष्णा नदीवरील या पुलाचे स्वप्न अनेक दशकांपासून अपूर्ण राहिले होते. मात्र, ना. शिवेंद्रराजे भोसले आणि आ. मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम होत आहे. त्यामुळे आता स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार होणार असून येणाऱ्या काळात काशीळ -कोपर्डे रहदारी सुरू होणार आहे.

यापूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांना दोन नद्यांच्या संगमावरून होड्यांच्या माध्यमातून प्रवास करून शेतीपर्यंत पोहोचावे लागत होते. पावसाळ्यात तर पूरस्थितीतही जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांना शेतीकामासाठी नदी पार करावी लागत असते. आता या पुलामुळे शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास संपणार असून, शेती, शिक्षण, रोजगार आणि बाजारपेठेच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाच्या बांधकामामुळे काशीळ येथील दोन्ही नदीच्या संगमाजवळ असणारे महादेव मंदिर आणि कृष्णा-उरमोडी संगम या ठिकाणांना पर्यटनाचा दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात या परिसराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास होणार असल्याचे संकेत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रविकुमार आंबेकर, शाखा अभियंता साईराज कुंभार आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वैभव गायकवाड यांच्या उपस्थितीत प्राथमिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. या कामासाठी शासनदरबारी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, त्यास तत्त्वतः मान्यता मिळाल्याने प्रत्यक्ष कामाच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. या पुलाच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी आणि सामाजिक संघटनांनी सातत्याने ना. शिवेंद्रराजे भोसले व आ. मनोजदादा घोरपडे यांच्या संपर्कात राहून पाठपुरावा केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT