कराड : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीसह तिजोरीतील पैशावरून सरकारमधील मंत्र्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. मात्र तिजोरीची चावी कोणाकडेच नसते आणि चावीचा कोणीच मालक नाही. तिजोरीची चावी आणि तिजोरीतील पैसा जनतेचाच आहे, हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतला.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी कराडमध्ये आल्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, पालघर जिल्ह्यात रूग्ण महिलेस रूग्णवाहिका दोन किलोमीटर रस्त्यावर सोडून गेली आणि त्यानंतर महिलेस दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होऊ कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिजोरीची चावी आणि तिजोरीतील पैशावरून केलेल्या वक्तव्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या तिजोरीची चावी ही कोणाकडेच नसते आणि चावीचा कोणीच मालक नाही.
तिजोरी कोणाचीच नाही आणि तिजोरीतील पैसा कोणाचेच नसून चावी व पैसेही जनतेचे आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे असे आवाहन केले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मंत्री मकरंद पाटील यांनी दर तीन तासाला शेतकरी आत्महत्या करत असल्याचे वक्तव्य केल्याची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू असे जाहीर केले आहे. आज ठेकेदार, शिक्षक सुद्धा आत्महत्या करू लागलेत हे सांगत योग्य वेळ केव्हा येणार असा प्रश्न उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाच्या धोरणावर टीका केली.