परळी : पत्नीच्या प्रसूतीसाठी एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेल्या दरे (ता. सातारा) येथील भारतीय सैन्य दलात जवान असलेले प्रमोद जाधव (वय 32) यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
प्रमोद जाधव 2014 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती लडाख (जम्मू, काश्मीर) येथे होती. पत्नी गरदोर असल्याने तिच्या प्रसूतीसाठी ते 1 महिन्याची सुट्टी काढून साताऱ्यातील गावी आले. पत्नीला प्रसूतीसाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी रात्री प्रमोद जाधव कामानिमित्त वाढे फाटा रस्त्यावरून जात असताना त्यांचा जरंडेश्वर नाका येथे भीषण अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी दरे या गावी जवान प्रमोद यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जि. प.चे माजी सदस्य राजू भोसले व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली होती; मात्र जिल्ह्यातील मंत्री व आमदारांनी जवान प्रमोद जाधव यांच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली होती. यावर दै. ‘पुढारी’ने परखड भूमिका घेत ‘देश हळहळला, ना मंत्री, ना खासदार, ना आमदार फिरकले’ असे परखड वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर बुधवारी खा. उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वतंत्रपणे जाऊन प्रमोद जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी नातेवाईकांनी घडलेला प्रकार व प्रमोदबाबत खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रराजे यांना माहिती दिली. त्यावर दोघांनीही आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. राजू भोसले, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, श्रीरंग देवरुखे, रघुनाथ जाधव, अजय काशीद, ॲड. अंकुश जाधव, प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते.