Sunil Tatkare File Photo
सातारा

Sunil Tatkare : एनडीएबाबत अनुकूलता असणाऱ्यांनी निर्णय करावा

सुनील तटकरे : कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार हे स्पष्ट करा

पुढारी वृत्तसेवा

कराड ःदोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार होते, हे स्पष्ट केले पाहिजे. आम्ही देशाचे आणि राज्याचे व्यापक हित पाहून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला होता आणि ही भूमिका पुढे नेणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच भाजप प्रणीत एनडीएसोबत येण्याची अनुकूलता असणाऱ्यांनी निर्णय करावा, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे देताना खासदार तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी ना. सुनेत्रा पवार आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या अडीच वर्षांत केलेली वाटचाल लक्षात घेता महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी ही जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण यांचे विचार व आदर्श यानुसार चालत राज्याच्या भविष्यासाठी सुनेत्रा पवार पूर्ण योगदान देतील, असा विश्वास खासदार तटकरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने ‌‘गिळंकृत‌’ केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना खासदार तटकरे यांनी अशा टीका-टिप्पण्यांना फारसे महत्त्व नाही, असे सांगत संजय राऊत काय बोलतात हे फारसे महत्त्वाचे नाही, असे सांगितले.

वडेट्टीवारांना खडे बोल

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता खासदार तटकरे यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला. वडेट्टीवार यांनी अगोदर चंद्रपूरचा महापौर कोणाचा होतोय ते पाहावे. काँग्रेसमध्येच पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला लगावत त्यांनी तसा प्रयत्न करू नये असे सुनावले.

अपघाताचे सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे

अजितदादांच्या विमान दुर्घटनेबाबत व्यक्त होत असलेल्या संशयांवर खासदार सुनील तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानेही चौकशी सुरू केली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेमागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT