Sunetra Pawar Karad-Raju Sanadi
सातारा

Sunetra Pawar : सुनेत्राताईंनी निभावली सत्ते पलीकडची परंपरा !

पुढारी वृत्तसेवा

- सतीश मोरे

कराडचा प्रीतिसंगम हा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील एक साधा भूभाग नाही, तो एक विचारकेंद्र आहे. तो एक संस्कारस्थळ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो एक राजकीय आत्मा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर उभं राहणं म्हणजे केवळ श्रद्धांजली अर्पण करणं नाही, तर एका संपूर्ण वैचारिक परंपरेसमोर नतमस्तक होणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले, अनेक गेले. पण काही स्थळं अशी असतात, जी व्यक्तींपेक्षा मोठी असतात. प्रीतिसंगम हे त्यातलं एक आहे.

अजित पवार यांचं प्रीतिसंगमाशी असलेलं नातं हे औपचारिक नव्हतं, ते राजकीय नव्हतं. तर ते भावनिक आणि वैचारिक होतं. ते चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी येऊन केवळ अभिवादन करत नसत, तर मौनात. चिंतनात. आत्मसंवादात आणि त्या शांततेतूनच ते प्रेरणा घेत असत, दिशा घेत असत, आणि कर्तव्याची जाणीव नव्याने जागी करत असत. राजकारणात प्रेरणास्थानं असतात, पण त्यांच्याशी नातं फार काळ टिकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ प्रीतिसंगमाचे आणि अजित पवारांचं नातं हे सातत्याचं होतं, परंपरेचं होतं अन्‌‍ संस्कारांचं होतं.

अजित दादांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या पश्चात सुनेत्रा ताईनी पण तेच केलं. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतिसंगमाला दिलेली भेट, ही केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता तो एक राजकीय संदेश होता, शांत, सौम्य, पण अर्थपूर्ण. अतिशय विपरीत, अनाकलनीय आणि दुःखद घटना घडून गेली. अशा परिस्थितीत सत्ता हाती आल्यानंतर पहिलं पाऊल कुठे टाकायचं यावर नेतृत्वाची दिशा ठरते. मंचावर की स्मृतीस्थळी? प्रचारात की प्रेरणास्थानी ? प्रसिद्धीत की परंपरेत ? सुनेत्रा पवार यांनी प्रेरणास्थानाची निवड केली. ही निवड राजकीय गणिताची नव्हती, ती राजकीय संस्कृतीची होती. महाराष्ट्राच्या राजकारणात आज सत्ता संघर्ष,आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद आणि गदारोळ यांचा काळ आहे. या पार्श्वभूमीवर प्रीतिसंगमावरची शांतता अधिक बोलकी ठरते. प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवार येण्यापासून ते परत गाडीत बसून निघेपर्यंतचा काळ हा राजकीय कार्यक्रमाचा वेळ नव्हती. तो एका स्त्रीच्या अंतर्मनाचा अवकाश होता. डोळ्यांत साचलेलं पाणी स्पष्ट दिसत होतं. ते वाहत नव्हतं, ते दाबून धरलेलं होतं. दुःख, जबाबदारी आणि संवेदनशीलता या तिन्ही गोष्टींचं मिश्रण त्या डोळ्यांत उतरलेलं होतं. त्या प्रीतिसंगमावर आल्या होत्या प्रेरणेसाठीच ! सत्तेच्या प्रदर्शनासाठी नव्हे... प्रतिमा निर्मितीसाठी नव्हे... राजकीय संदेशासाठी नव्हे तर दिशा शोधण्यासाठी!

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठीचं आव्हान हे दोन्ही ओझं त्या मनात घेऊन आल्या होत्या. या क्षणी त्या उपमुख्यमंत्री नव्हत्या. त्या एक स्त्री होत्या... एक आई होत्या. त्या अनेक महिलांना भेटल्या. वृद्ध महिलांचा हात धरत संवाद साधला, पण त्या डोळ्यांत एक वेगळंच मौन होतं. ते मौन म्हणत होतं “मी उपमुख्यमंत्री झाले असेन, पण मी आधी एक स्त्री आहे !

“प्रीतिसंगमावर त्यांचं येणं ही एक औपचारिक भेट नव्हती. ती एक अंतर्मनाची यात्रा होती. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा... कराडची माती आणि प्रीतिसंगमाची शांतता या तिन्ही गोष्टी त्या शोधत होत्या. त्या समाधीसमोर नतमस्तक झाल्या, पण खरं नमन त्यांनी जबाबदारीसमोर केलं.

कारण इथे शब्द नाहीत, विचार आहेत. इथे घोषणा नाहीत, मूल्य आहेत. इथे राजकारण नाही, संस्कार आहेत! अजित पवार यांना जिथे प्रेरणा मिळायची, तिथेच सुनेत्रा पवार यांनी नतमस्तक होणं, ही केवळ श्रद्धांजली नाही, ती एक परंपरेची सातत्यपूर्ण साक्ष आहे. सत्ता ही बदलत राहते. पदं येतात आणि जातात. नेते बदलतात, पण परंपरा टिकली पाहिजे. विचार टिकले पाहिजेत. संस्कार टिकले पाहिजेत. प्रीतिसंगम याचाच साक्षीदार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आलेल्या सुनेत्रा ताईंची कराड भेट ही एक बातमी नाही, ती एक खोल अर्थ असलेली घटना आहे. कारण ती सांगते सत्तेचा वारसा नव्हे, तर संस्कारांचा वारसा पुढे जात आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आज सर्वाधिक गरज आहे ती याच वारशाची..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT