पुसेसावळी : राज्य आणि देश प्रगत झाल्याच्या मोठ मोठ्या वल्गना आज सर्वत्र ऐकू येतात. कोट्यवधींच्या योजना, अब्जावधींच्या अर्थसंकल्पीय घोषणा, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया यांसारख्या संकल्पना चर्चेत असतात. मात्र या झगमगत्या शब्दांआड आजही एक भयावह वास्तव दडले आहे. ज्याचे दर्शन ऊसतोड कामगाराच्या एका लहान मुलाच्या आयुष्यातून घडत आहे.
आई-वडील दिवस-रात्र ऊसाच्या फडात राबत असताना, उसतोड मजुराचा मुलगा शिक्षणाच्या वयात कसरती करून दोन वेळच्या जेवणाची आणि थोड्याशा पैशाची सोय करतो आहे. शिक्षण किती झाले, असे विचारले असता त्याचे उत्तर येते ‘दोनवी’ (दुसरी) त्याच्या शब्दांत कुठलीही तक्रार नाही, पण त्या दोन अक्षरांत संपूर्ण व्यवस्थेचे अपयश दडलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, छोट्या खोलीत किंवा उघड्या मैदानात हे चित्र दिसते.
बालपण खेळण्यात, शिकण्यात आणि स्वप्न पाहण्यात जायला हवे असताना, हे मूल आपल्या शरीरावर प्रयोग करुन लोकांचे मनोरंजन करत आहे. केवळ पाच-दहा रुपयांसाठी त्याला स्वतःच्या जीवाची, आरोग्याची पर्वा नाही. कारण पोटाची आग स्वप्नांपेक्षा मोठी ठरते. एकीकडे राजकारणी मंडळी कोट्यवधींच्या घोटाळ्यांवर चर्चा करतात, निवडणुकीत विकासाचे ढोल वाजवतात; तर दुसरीकडे गोरगरीब कुटुंबातील मुले मूलभूत शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षण हक्क कायदा, बालकामगार प्रतिबंध कायदा कागदावरच का उरतो? हा प्रश्न या मुलाच्या कसरतीतून पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. अशा असंख्य मुलांचे बालपण उसाच्या फडात, वीटभट्टीवर, बांधकामावर व रस्त्यांवर हरवत आहे.
देशाच्या भवितव्याचे स्वप्न ज्यांच्यावर अवलंबून आहे, तीच पिढी आज संघर्षात अडकली आहे. ही केवळ एक बातमी नाही, तर समाजाच्या संवेदनशीलतेला दिलेला आरसा आहे. विकासाच्या घोषणा खऱ्या ठरवायच्या असतील, तर या मुलांच्या डोळ्यात शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि सन्मानाची स्वप्ने दिसली पाहिजेत. अन्यथा प्रगतीचा गाजावाजा हा फक्त शब्दांचा खेळ ठरेल आणि वास्तव मात्र असेच विदारक राहील.