सातारा

साखर उत्पादनात यंदा 100 लाख क्विंटलने घट

Arun Patil

सातारा : राज्यामध्ये दुष्काळ पडल्याने ऊस गाळपावर त्याचा परिणाम झाला आहे. गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने झाल्यानंतरही साखर उत्पादनाची गाडी धिम्या गतीनेच चालली आहे. तीन महिन्यांनंतर राज्यातील सर्व 8 विभागांमध्ये 24 जानेवारीअखेर 574.1 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी उत्पादनाचा हाच आकडा 672.76 लाख क्विंटल होता. त्यामुळे यंदा राज्याच्या साखर उत्पादनात तब्बल 100 लाख क्विंटल टनाने घट झाली आहे. दरम्यान, अनेक कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यानेही साखर उत्पादन घटले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील गळीत हंगामास प्रारंभ झाला. राज्यात सध्याच्या घडीला खासगी 101 आणि सहकारी 97 अशा 198 साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप केले जात आहे. यंदा राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला असून तो सिंचनाऐवजी घरगुती वापरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे उसाला पाणी देणे शेतकर्‍यांना जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनातही घट झाली आहे.

ऊस उत्पादनात झालेली घट, इथेनॉलकडे कारखान्यांचा वाढलेला ओढा व केंद्र सरकारचे धरसोड वृत्तीचे धोरण यामुळे साखर उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षी राज्यात 1300 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळामुळे 900 लाख क्विंटल साखर उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन तीन महिन्यानंतरही 600 लाख क्विंटल साखरही तयार झालेली नाही. आणखी महिनाभर हंगाम सुरू राहणार असून अंदाजित उत्पादनही होणार नसल्याचे वास्तव आहे.

यंदाच्या हंगामात गाळप व उतार्‍यात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहिला आहे. कोल्हापूर विभागातील 37 कारखान्यांनी आतापर्यंत 146.34 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 10.81 टक्के पडला आहे. पुणे विभागातील 30 कारखान्यांनी आतापर्यंत 124.87 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 9.7 टक्के पडला आहे. सोलापूर विभागातील 47 कारखान्यांनी आतापर्यंत 114.86 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 8.67 टक्के पडला आहे. अहमदनगर विभागातील 26 कारखान्यांनी आतापर्यंत 71.4 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 9.16 टक्के पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील 22 कारखान्यांनी आतापर्यंत 46.92 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 8.9 टक्के पडला आहे. नांदेड विभागातील 29 कारखान्यांनी आतापर्यंत 64.49 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 9.36 टक्के पडला आहे. अमरावती विभागातील 3 कारखान्यांनी आतापर्यंत 4.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उतारा 8.9 टक्के पडला आहे. नागपूर विभागातील 4 कारखान्यांनी आतापर्यंत 72 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, उतारा 3.73 टक्के पडला आहे.

उसाची काडी झाली तरीही उतार्‍यात घट

दुष्काळामुळे सधन समजल्या जाणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील उसालाही पुरेसे पाणी मिळाले नसल्याचे वास्तव आहे. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी ऊस जगवले. मात्र, बहुतांश शेतकरी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून राहिले. दुष्काळामुळे उसाची काडी झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण ऊस तुटून जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुष्काळामुळे उसातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन केवळ साखर राहिली आहे. अशा परिस्थितीतही साखर उतार्‍यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनीही ही घट केली काय? असा सवाल केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT