11th online admission | ऑनलाईन प्रक्रियेचा खेळ; विद्यार्थ्यांचा जातोय वेळ File Photo
सातारा

11th online admission | ऑनलाईन प्रक्रियेचा खेळ; विद्यार्थ्यांचा जातोय वेळ

अकरावी प्रवेश अपूर्ण : शैक्षणिक वर्षाचे भवितव्य अंधारात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्रीय ऑनलाईन पद्धत यंदा विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. तांत्रिक अडचणी, संकेतस्थळावरील गोंधळ आणि अर्ज भरण्यातील अपुर्‍या ज्ञानामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला आहे. मे महिन्यात निकाल लागूनही जुलै अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

जिल्ह्यातील विविध शाखांच्या सुमारे 55 हजार जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला. अनेकांना अर्ज भरताना पसंतीक्रम निवडण्यात चुका झाल्या, ज्याचा मोठा आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. पात्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयाऐवजी विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घ्यावा लागला आहे. प्रक्रियेतील एका विचित्र नियमानुसार, मिळालेले महाविद्यालय नाकारल्यास विद्यार्थी थेट प्रक्रियेतून बाहेर फेकला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा नसतानाही मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे भाग पडत आहे. या कारणांमुळे महाविद्यालयीन कर्मचारी आणि पालकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.

या सर्व गोंधळात प्रवेश प्रक्रिया लांबल्याने अकरावीचे वर्ग वेळेवर सुरू होऊ शकलेले नाहीत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ज्या महाविद्यालयांमध्ये 50 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्यांना वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा महाविद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे आणि ज्या महाविद्यालयांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत, त्यांचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. एकंदरीत, सुलभतेसाठी आणलेल्या ऑनलाईन प्रक्रियेने विद्यार्थ्यांची आणि पालकांची चिंता अधिकच वाढवली आहे.

शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

बारावीसाठी बोर्ड परीक्षा असल्याने बोर्डाच्या वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमपूर्ण होणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्ष उशीरा सुरु झाले तरी वार्षिक वेळापत्रकानुसार सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यावर प्राध्यापक वर्गाचा कल राहतो. त्यामुळे कमी कालावधीत जास्त अध्यापन होणार असले तरी विद्यार्थ्यांनी ते ज्ञान किती ग्रहण केले आहे यावर त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा पाया अवलंबून राहणार आहे. त्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष उशीरा सुरु झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT