खंडाळा : खंडाळा शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर केसुर्डीत पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पारगाव, खंडाळ्यात काही ठिकाणी वीजेचे खांब वाकल्याने वीज यंत्रणा कोलमडली पडली असल्याचे दिसून आले.
गुरुवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सकाळपासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत असताना विजांच्या कडकडाटासह व तीव्र मेघगर्जनेने पावसाला सुरुवात झाली. यावेळी सुटलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील दुकाने, पादचारी आणि वाहनचालक यांची तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.
वादळामुळे ठिकठिकाणी वीजेचे खांब वाकले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण खंडाळा शहर आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच तालुक्यातील पळशी येथील भाऊनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडले होते. खंडाळा ते असवली जाणाऱ्या रस्त्यावर तर महामार्गावर बसस्थानका नजिक सेवा रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला सारून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान, तालुक्यातील नायगाव, केसुर्डीमध्ये जोरदार पाऊस झाला.पांडुरंग जाधव (केसुर्डी) यांच्या सीताफळ बागेवर पत्राशेड पडल्याने झाडांचे तर गावातील अन्य पाच ते सहा ठिकाणी पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.