Phalatan Ganesh Visarjan: फलटणमध्ये विसर्जन मिरवणुकीत दगडफेक File Photo
सातारा

Phalatan Ganesh Visarjan: फलटणमध्ये विसर्जन मिरवणुकीत दगडफेक

तणावपूर्ण वातावरण : 14 जणांना अटक, 1 पसार

पुढारी वृत्तसेवा

फलटण : अनंत चतुदर्शीला फलटण शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राडा झाला. शहरातील जिंती नाका परिसरात मिरवणुकीत झालेल्या वादावादीतून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. पोलिसांसमोरच दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली असून 1 जण पसार आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

विशाल पांडुरंग माळी, देविदास बापू माळी, संपत भरत माळी, अजय पांडुरंग माळी, रंगराव भरत माळी, अमर राजू माळी, नेताजी प्रकाश माळी, प्रकाश काळूराम माळी, अमोल आकाराम मोरे, रमेश संजय माळी, अजय रघुनाथ माळी (सर्व रा. सगुनामातानगर, मलटण ता. फलटण), सुशांत सुनील जुवेकर, शंकर रामराव जुवेकर (रा. महतपुरा पेठ, मलटण) व एक अल्पवयीन अशा 14 जणांना पोलिसांनी अटक केली असून अजय संजय जाधव (रा. स्वामी समर्थ मंदिर मलठण ता. फलटण) हा पसार आहे. याप्रकरणी हवलदार संदीप लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, अनंत चतुदर्शी असल्याने फलटण शहरातून दुपारीच विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. दुपारी 3.30 च्या सुमारास जिंती नाका परिसरात शहरातील शिवशक्तती गणेशोत्सव मंडळ आणि जय भवानी तरूण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची कोणत्या तरी कारणावरून वादावादी झाली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्त्यांना वाद करू नका, अशी तंबी दिली. मात्र, पोलिसांनी सूचना दिल्यानंतरही कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. प्रकरण वाढत गेल्यानंतर दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली.

यावेळी इतर मंडळांचे पदाधिकारी आणि मिरवणुक पाहण्यास आलेल्या गणेशभक्तांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होवून पळापळ झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारत कार्यकर्त्यांना चांगलेच फटके लगावले. यानंतर दगडफेक करणार्‍यांना ताब्यात घेत अटक केली. तर एक जण पसार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT