मारूल हवेली : तीन महिन्यापूर्वी विहे (ता.पाटण) येथे झालेल्या घरफोडीत चोरीस गेलेले सोने मल्हारपेठ पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने तपास लावून फिर्यादीला परत केले. तसेच गहाळ झालेले मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले. यामध्ये चोरीस गेलेले 3 लाख 35 हजार रुपये किंमतीचे 10.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 74 हजाराचे 10 मोबाईल असा 5 लाखाचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विहे येथे गत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरफोडी झाली होती. यावेळी बंद घरातून सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. यासह अन्य एका चोरीच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व मल्हारपेठ पोलीस ठाणे यांनी समांतर तपास करुन चोरीचा छडा लावला होता. आरोपीकडे सखोल चौकशी करुन गुन्ह्यातील 3 लाख 35 हजार रुपये किंमतीचे 10.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. ते शनिवार दि.13 रोजी मूळ मालकांना परत देण्यात आले.
दोन्ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर, पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले, पोलिस उप-निरीक्षक रामराव वेताळ, सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक अंकुशी, पो.हवा. पगडे, पो.हवा. सारुख, पो.हवा.सचिन पाटील, पोलिस शिपाई सिद्धनाथ शेडगे, अमोल पवार, अमोल पिसे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई महेश पवार यांनी केली. दरम्यान मुद्देमाल ताब्यात घेणार्या तक्रारदारांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व मल्हारपेठ पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.