सातारा : भारतात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेतले जाते. मात्र, इथेनॉल निर्मितीनंतर राज्यात गेल्या तीन-चार वर्षांत साखरेच्या उत्पादनात घट होऊ लागली आहे. 2023-24 या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन 1 कोटी 14 लाख टन झाले होते. मात्र, यंदा 2024-25 या वर्षात तब्बल 33 लाख टन साखरेचे उत्पादन घटून ते 81 लाख 41 हजार टनावर आले असल्याचे आकडेवारी सांगते. तसेच साखर उतार्यातही तब्बल पाऊण टक्के घट झाली आहे. दरम्यान, साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढली असताना साखर उत्पादन घटले आहे.
2023-24 या हंगामात महाराष्ट्रात एकूण 208 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले होते. यामध्ये 104 सहकारी व 104 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या हंगामात सर्व कारखान्यांची गाळप क्षमता दैनंदिन 9 लाख 51 हजार 150 टन इतकी होती. हंगाम कालावधीत 10 कोटी 76 लाख टन उसाचे गाळप करून 1 कोटी 14 लाख 42 हजार टन साखरेचे उत्पादन घेतले गेले. तर राज्याचा सरासरी 10.27 टक्के उतारा पडला होता.
तर दुसरीकडे 2024-25 या हंगामात 99 सहकारी व 101 खासगी अशा एकूण 200 कारखान्यांनी गाळप केले. विशेष म्हणजे या कारखान्यांची गाळप क्षमता ही 9 लाख 70 हजार 50 टन इतकी आहे. या हंगामात कारखान्यांनी 8 कोटी 53 लाख 96 हजार टन उसाचे गाळप केले. यातून 81 लाख 48 हजार टन साखरेचे उत्पादन घेतले. गतवर्षीचा हंगाम विधानसभा निवडणुकांमुळे तब्बल 1 महिना उशिरा सुरू झाला होता. याचा परिणाम गाळप हंगामावर होऊन गाळप व उत्पादन कमी झाले. याचबरोबर कारखान्यांनी इथेनॉल व विविध उपपदार्थांकडे आपला मोर्चा वळवल्यानेही साखर उत्पादनावर फरक पडला आहे. 2023-24 व 2024-25 या दोन हंगामाचा विचार करता 2023-24 मध्ये 1 कोटी 14 लाख 42 हजार टन, तर 2024-25 मध्ये 81 लाख 48 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. याचा अर्थ गतवर्षीच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादनात 33 लाख टन साखरेची घट झाली आहे.
उपपदार्थांमुळे होणार्या साखर उतार्याकडे दुर्लक्ष
उपपदार्थांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक कारखान्यांनी विस्तारवाढ केली आहे. त्यामुळे गाळप मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, त्या तुलनेत साखर उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. तयार झालेल्या साखरेची मळी करणे, साखर व रसापासून इथेनॉल निर्मिती, साखरेपासून औषध क्षेत्राला लागणारी रॉ शुगर केली जात आहे. याचा फटका साखर उतार्याला बसत आहे. 2023-24 साखर उतारा हा 10.27 टक्के होता, तो गत हंगामात थेट 9.48 टक्क्यांवर आला.