Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale: राज्यातील घाट रस्त्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेत माहिती : ‘पुढारी’च्‍या वृत्त मालिकेचा इफेक्‍ट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यातील जनतेला सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, रस्ते विकासाबरोबरच घाट रस्ते सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबवण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

दै. 'पुढारी'ने सुरू केलेल्या 'पावसाळ्यातील धोकादायक घाट रस्ते' या वृत्तमालिकेवर पावसाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली. त्‍यावर शिवेंद्रराजेंनी राज्‍यभरातील जनतेला उत्तरातून दिलासा दिला. राज्यातील अनेक घाटरस्ते धोकदायक झाल्याने अपघात होत आहेत. या घाटरस्त्यांवरील समस्यांचा ऊहापोह करणारी 'पावसाळ्यातील धोकादायक घाट रस्ते' या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रसिद्ध करून दै. 'पुढारी'ने राज्य शासनाचे लक्ष वेधले. या मालिकेच्या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटासह इतर घाटरस्त्यांवर वारंवार घडणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना शिवेंद्रराजे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, रस्त्याची क्षमता वाढवणे आणि सुरक्षा उपाययोजना बळकट करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाकडून विविध टप्प्यामध्ये कामे हाती घेतली आहेत. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते सातारा जिल्ह्यातील कुंभरोशी (प्रतापगड पायथा) या राज्य महामार्गावरील सुमारे २४.२ कि.मी. लांबीच्या रस्त्याची सुधारणा व रूंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एसएसआयडीसी) मार्फत हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल (हम) अंतर्गत प्रगतिपथावर आहे.

या प्रकल्पात संबंधित रस्त्याचे रुंदीकरण, मजबूत डांबरीकरण, वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा आणि आधुनिक तांत्रिक उपाययोजनाचा समावेश केला आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १४ कि.मी. लांबीच्या सध्याच्या ५.५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे ७ मीटर रुंदीपर्यंत डांबरीकरण करण्यात येत आहे. तसेच दोन्ही बाजूंना १.५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे ७ मीटर रुंदीपर्यंत डांबरीकरण करण्यात येत आहे. तसेच दोन्ही बाजूंना १.५० मीटर रुंदीचे खांदे विकसित केले जात आहेत. याशिवाय उर्वरित सुमारे १० कि.मी. लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येत आहे. कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गावरील सुमारे १६.३० किमी लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची कामेही लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.

शिवेंद्रराजे म्हणाले, आंबेनळी घाट हा तीव्र उतार, अवघड वळणे आणि खोल दर्‍यांमुळे संवेदनशील घाटमार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. घाटातील धोकादायक ठिकाणी अँटी-कॅश बॅरियर्स, मजबूत सुरक्षा कठडे, संरक्षक भिंती, रिफ्लेक्टर, कॅट-आयज, परावर्तित दिशादर्शक फलक आणि सूचना फलक बसवण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे विशेषत: रात्रीच्यावेळी आणि धुक्याच्या वातावरणात वाहनचालकांना मार्ग स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार आहे. २४ मे रोजी आंबेनळी घाटातील अपघात हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेे. अपघातस्थळी रस्त्याची रुंदी सुमारे १४ मीटर असून तेथे सुरक्षा कठडे, अँटी-क्रॅश बॅरिअर्स आणि दिशादर्शक फलक उपलब्ध होते.

राज्यातील सर्व अपघात प्रवण घाटरस्ते आणि प्रमुख मार्गांचा स्वतंत्र आढावा घेण्यात येत असून रस्ते सुरक्षा लेखापरीक्षण करण्यावर भर दिला जात आहे. ज्याठिकाणी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांची आवश्यक आहे तेथे तातडीने कामे हाती घेण्यात येणार आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्ता चिन्हांकन, वेगमर्यादा दशक फलक, चेतावणी फलक आणि प्रकाशयोजना यावरही विशेष भर दिला जात आहे. रस्ते विकासाची कामे करताना केवळ वाहतुकीची क्षमता वाढवणे हे उद्दिष्ट नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT