Shambhuraj Desai | काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे रहा : ना.देसाई Pudhari
सातारा

Shambhuraj Desai | काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे रहा : ना.देसाई

निवडणुकीपुरते भावनिक कारण पुढे करून मत मागणाऱ्यांना थारा देऊ नका,” असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पुढारी वृत्तसेवा

सणबूर : “ही निवडणूक भावनिक मुद्द्यांवर नाही तर विकासकामांवर लढवायची आहे. ज्यांनी प्रत्यक्ष कामे केली, निधी आणला आणि जनतेच्या समस्या सोडवल्या, त्यांच्या पाठीशी मतदारांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. निवडणुकीपुरते भावनिक कारण पुढे करून मत मागणाऱ्यांना थारा देऊ नका,” असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार मृणाल पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार नितीन काळे व संपदा जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, “नेता निवडून दिल्यानंतर जनतेत राहून काम करणारा असावा. निवडणुकीपुरते गावात यायचे आणि निवडणूक संपली की गायब व्हायचे, हे चालणार नाही. माझे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार चोवीस तास जनतेच्या सेवेत राहतील, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. त्यामुळे काम करणाऱ्यांनाच साथ द्या.”

विकासकामांच्या तुलनेचा दाखला देताना ते म्हणाले, “मंद्रुळकोळे या एका गावासाठी मी दहा कोटींचा निधी दिला. विरोधकांनी संपूर्ण तालुक्यात मिळून सात कोटींची कामे आणली आणि त्याचेच फ्लेक्स लावून गाजावाजा केला. काम करणाऱ्या नेत्यामध्ये आणि दिखावा करणाऱ्यामध्ये हाच फरक आहे. कामे खेचून आणण्याची धमक असावी लागते आणि ती माझ्यात आहे, आमदार, राज्यमंत्री आणि आता पालकमंत्री म्हणून तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे”.

मंद्रुळकोळे खुर्द येथील संदर्भ देताना त्यांनी सांगितले, “खुर्दसाठी दिलेली विकासकामे काही विरोधी नेत्यांनी परत पाठवली. ‌‘असा विकास करू नका‌’ असे म्हणणारा नेता मी आजवर पाहिला नाही. मात्र कुणी कितीही अडथळे आणले तरी विकासकामे होणारच, हा माझा शब्द आहे.” महिलांच्या सहभागाबाबत बोलताना ना. देसाई म्हणाले, “राजकारणात महिलांनी मागे राहता कामा नये. विकासकामे तर सुरूच राहतील, पण नवीन व नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन माझ्याकडे या; त्यासाठी लागणारा निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी ताकद जिल्ह्याने पाहिली आहे.”म्हणून विकास पाहून मतदान करा असे आवाहन ना. शंभूराज देसाई यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT