सातारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या महामंडळाच्या सातारा विभागातील बसेसचे ऐन उन्हाळी हंगामात रविवारी वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे एसटीची वाट पाहात प्रवाशांना तासन्तास ताटकळत रस्त्यावर उभे रहावे लागले. रविवारी सातारा बसस्थानकात पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र प्रवाशांना एस.टी. बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पुणे-बंगळूर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा बसस्थानकात रविवारी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. गावोगावी यात्रा जत्रा, लग्नसराई, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लागलेली सुट्टी त्यामुळे प्रवाशांचा लोंढा एसटीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लांब पल्यासह ग्रामीण भागात धावणार्या सर्व एसटी बसेस हाऊसफुल्ल भरुन वाहताना दिसत आहेत. तसेच आगाऊ तिकीट आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रावरही प्रवाशांची गर्दी दिसत आहे.
रविवारी बसेसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडलेले दिसले, कारण प्रवासी एसटी बसेसविना रस्त्यावर उभा असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. सातारा बसस्थानकातील पुणे, मुंबई व वाई फलाटावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनामार्फत बसेस उपलब्ध होतील त्या पध्दतीने पुणे व मुंबईकडे बसेस सोडण्यात येत होत्या, तरीही प्रवाशांची गर्दी कायम होती. रात्री उशिरापर्यंत पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या गर्दी कायम होती. महामार्गावरील टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असल्याने बसेसचे वेळापत्रक कोलमडून गेले होते.