सातारा : प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्यावर विश्वा ठेवून गेले कित्येक वर्षे प्रवासी एसटी बसमधून प्रवास करत आहेत. मात्र एसटीच्या जनशिवनेरी बसचा प्रवाशांना नाहक भुर्दंड बसत आहे. कोल्हापूर ते सातारा जनशिवनेरीने प्रवास केला तेव्हा तिकीटाचे 339 रुपये द्यावे लागले. तर पुन्हा त्याच बसने प्रवास केला तर तिकीटाचे 354 रुपये मोजावे लागले. त्यामुळे तिकीटामध्ये सुमारे 15 रुपयांची तफावत असल्याने एसटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत महामंडळाने योग्य निर्णय न घेतल्यास प्रवाशांना जनआंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा दिला आहे.
याबाबत कोल्हापूर आगाराच्या जनशिवनेरी बसमधून कोल्हापूर सातारा प्रवासात दि. 21 ऑगस्ट रोजी एका प्रवाशाला एक विचीत्र अनुभव आला. दि. 21 रोजी जनशिवनेरी बस एम 6473 या बसने कोल्हापूर ते सातारा प्रवास केला. तेव्हा तिकीटाचे 339 रुपये वाहकांला दिले. त्यानंतर पुन्हा दि. 22 ऑगस्ट रोजी जनशिवनेरी बस एम 7152 या बसने प्रवास केला तेव्हा मात्र तिकीटासाठी वाहकाला 354 रुपये द्यावे लागले, त्यावेळी वाहकास तिकीटाचे एवढे पैसे कसे? अशी विचारणा केली तेव्हा वाहकाने मशिनमधून जे तिकीट आले आहे ते तुम्हाला दिले आहे, असे उत्तर दिले. त्यानंतर 15 रुपये जास्त गेले तोच मार्ग, तीच जनशिवनेरी सेवा, असे असतानाही तिकीट मात्र वेगळे कसे असा प्रश्न प्रवाशाला पडला.
जास्तीच्या 15 रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागला ते वेगळेच. पुन्हा दि. 26 ऑगस्ट रोजी त्याच मार्गावर त्याच प्रवासी बसने प्रवास केला तेव्हा मात्र 339 रुपये तिकीटाचे पैसे वाहकाला द्यावे लागले. दि. 28 ऑगस्ट रोजी मात्र 354 रुपये तिकीटाचे दिले. म्हणचे नक्की हा काय प्रकार आहे? हे प्रवाशांना समजत नव्हते. एका प्रवासात 339 रुपये तर एका प्रवासात 354 रुपये तिकीट पडत आहे. यावरून प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याकडे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटाचा नाहक भुर्दंड बसू लागला आहे. संपूर्ण राज्यात ईटीआयएम सिस्टिम ज्यावेळेस इम्प्लीमेंन्ट केली त्यावेळी त्याचे टेस्टिंग केले की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहकाला अफरातफर व इंटरफेअर करण्याचा अॅाप्शन नाही. त्यामुळे विनाकारण वाहकाला प्रवाशांच्या रोषास व तक्रारीस सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी मात्र चुका करुनही बिनधास्त त्यांच्या हाताखालील अधिकारी व कर्मचार्यावर हुकूमशाही गाजवत आहेत. अलिशान कार्यालयात बसून थंड हवा घेणार्या अधिकार्यांचे आता तरी डोळे उघडतील का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.