Spend three and a half crores from district planning - Ajit Pawar's suggestion to the Collector
जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटी खर्च करा- अजित पवार यांची जिल्हाधिकार्‍यांना सूचना  File Photo
सातारा

जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटी खर्च करा

पुढारी वृत्तसेवा

कराडचा पाणीप्रश्न तातडीने मिटला पाहिजे यासाठी आवश्यक ती उपाययोजना करत नवीन पंप खरेदी करावा. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून नवीन पाईपलाईन व अन्य आवश्यक कामे पूर्ण करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजयसिंह यादव, सादिक इनामदार यांच्यासह कराडमधील अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कराडमधील पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली. मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. मात्र तुम्ही मला आत्ता एवढ्या उशिरा का सांगत आहात? अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडच्या पाणी प्रश्नाबाबतची सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याचबरोबर मुख्याधिकार्‍यांना फोन जोडून देण्यास सांगितले. मात्र विजयसिंह यादव व सादिक इनामदार यांनी या विषयावर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करावी, अशी विनंती करत पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन व नवीन मोटर खरेदी करावी लागणार असल्याचे सांगितले. या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री पवार

यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. कराडमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी यंत्रणा नाही का ? जुन्या पंपिंग स्टेशनला स्पेअर मोटर नाही का ? अशी विचारणा करत जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी आजवर केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. तसेच जिल्हा नियोजन मंडळातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून तातडीने नवीन मोटर व नव्या पाईपलाईनसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी सूचना जिल्हाधिकारी यांना यावेळी केल्याचे राष्ट्रवादी अजित पवार समर्थक सादिक इनामदार यांनी सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT