कामती : कांद्याच्या शंभर पोत्यांना अवघा चौदाशे रुपये दर मिळाल्याने घोडेश्वर येथील प्रगतशील शेतकरी लखन माने यांनी आपल्या दोन एकर शेतातील कांदा पेटवून दिला आहे. या घटनेमुळे परिसरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तर शेतकरी वर्गातून हमी भाव नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लखन माने यांनी मोठा खर्च करून दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवड कालावधी पाच ते सहा महिन्यांचा असतो. जमीन मशागतीपासून खर्च होतो. कांदा बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाणी यासाठी हजारो रुपयांचा खर्च करण्यात आला. कांदा पिकांची जोपासना करणे, गवत काढणे, पिकांची मशागत करणे यालाही वेळ आणि पैसे खर्च करावे लागते. इतके करून कांदा काढणीसाठी मजुरांची जमवाजमव करून हजारो रूपयांची मजुरीही द्यावी लागते.
शेतातून काढलेल्या कांद्याची पात कापून प्रतवारी करावी लागते. प्रतवारी म्हणजे समान आकाराचा कांदा एका पोत्यात भरावा लागतो. प्रतवारी केल्याशिवाय मार्केट कमिटीत भाव दिला जात नाही. अशा पद्धतीने उत्तम प्रतवारी करूनही जेव्हा पदरमोड करून आणलेल्या उत्तम कांद्यालाही घाऊक बाजारात मात्र अत्यंत कमी दर मिळतो. एकूणच कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. 100 पोत्यांच्या कांद्याला अवघी 1400 रुपयांची पट्टी मिळाल्याने हतबल झालेल्या लखन माने यांनी अखेर शेतातील कांद्याला आग लावून आपला संताप व्यक्त केला.
शेतकऱ्याने जगायचं कसं? असा सवाल आता परिसरातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कांद्याला योग्य हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.