File Photo
सातारा

सोलापूर : पीकविमा कंपनीकडून तुटपुंजी रक्कम जमा

बार्शी तालुक्यातील शेतकरी संतप्त; आंदोलनाचा दिला इशारा

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : खरीप हंगामात पिकात पाणी साठून नुकसान झाल्याप्रकरणी तालुक्याला 114 कोटी रुपये मंजूर झाले. ते पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर टप्प्या टप्प्याने जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली. मात्र ‘थोडी खुशी जादा गम’ अशीच परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली.

विम्याची अगदी तुटपुंजी रक्क्कम विमा कंपनीकडून मिळत असल्याचा आरोप शेतकर्‍यांतून केला जात आहे. कमी रक्कम जमा करून आमच्या तोंडाला विमा कंपन्यांकडून पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप केला जात असल्याने शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एकीकडे अगदी कमी रक्कम देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे विमा कंपन्यांनी वितरित केलेली विम्याची रक्कम नेमकी कोणत्या निकषानुसार वितरित केली याची माहिती बाहेर येणे व शेतकरी बांधवापर्यंत जाणे गरजेचे आहे.

स्वतःला शेतकर्‍यांचे कैवारी समजून शेतकर्‍यांच्या आंदोलनात घुसणारे शेतकरी संघटनेचे ते नेते सध्या कुठे भूमिगत आहेत, तसेच आजी माजी आमदार, लोकप्रतिनींधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकर्‍यांतून बोलले जात आहे. आमच्या पैशावर डल्ला मारला जात असताना शेतकरी संघटना मूग गिळून गप्प कशा आहेत असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी बांधवांमधून उपस्थित केला जात आहे. सरत्या हंगामात सततच्या पावसाने शेतकर्‍यांची पिके पाण्यात गेल्यामुळे तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येत होती.

तालुक्यातील 89 हजार 990 शेतकरी बांधवांनी विमा कंपनीकडे पीक विमा भरला होता. पिके पाण्यात गेल्यावर मुदतीत पीक नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीकडे दिली होती. त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात येऊन त्यांचे हात ओले करत नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून कंपनीकडे पाठविले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आपल्याला आपण भरलेल्या विम्यापोटी नियमानुसार योग्य नुकसान भरपाई भेटेल अशी आशा लावून बसले होते. मात्र त्यांच्या आशेवर पडलेल्या रकमेनुसार विरजण पडले आहे. बार्शी शहरासह तालुक्यातील सर्वच भागात पिकांना हानी पोचवणारी सतत मोठी पर्जन्यवृष्टी झालेली असल्याने प्रशासनाने दुजाभाव न करता सर्वच मंडळातील पंचनामे करण्याबाबत आदेश करावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा निर्णय तेव्हा शेतकरी बांधवांमधून घेतला गेला होता.

तालुक्यात सरासरी 160 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पिके पिवळी होती. गत अनेक वर्षापासून शहर व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मुळावर वरूणराजा उठला असल्याचे चित्र तालुक्यात निदर्शनास येत आहे. पिके उभी असताना एकही दिवस पावसाशिवाय जात नव्हता. तेव्हाच्या अतिरिक्त पावसामुळे पिकांची मुळीच बंद पडल्याने पिके जागेवरच पाण्यात सडून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना शासन व प्रशासन स्तरावरून भक्कम आधार देणे आवश्यक होते. गत खरीप हंगामात सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कांदा व बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

जून व जुलै महिन्यातच सरासरी पेक्षा अडीच पट जास्त पाऊस झाला होता. खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. सततचा पाऊस व शंखी गोगलगाय, कीड आळीचा प्रादुर्भाव, तसेच यलो मोझँक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे अतिजास्त नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT