Small change shortage File
सातारा

Small change shortage: लहान नोटा व सुट्या पैशाची चणचण

ग्रामीण भागात रोख व्यवहारात व्यापारी; ग्राहकांची अडचण

पुढारी वृत्तसेवा

मारुल हवेली : बाजारपेठेत सध्या 10, 20 आणि 50 रुपयांच्या लहान नोटा व सुट्या पैशांची तीव्र चणचण जाणवत आहे. किरकोळ खरेदी, भाजी-बाजार, किराणा दुकाने, बस-रिक्षा भाडे, छोटे-मोठे दैनंदिन व्यवहार यामध्ये ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डिजिटल पेमेंट्स वाढले असले तरी ग्रामीण भागात रोख व्यवहार करताना सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या रोजच्या व्यवहारावर थेट परिणाम करणारी ही चणचण मुख्यतः 100, 200 व 500 रुपयांच्या मोठ्या नोटा बँका व एटीएममधून जास्त येत असल्याने निर्माण झाली आहे. पैसे सुटे करणे कठीण पडते. त्यातच बाजारात उपलब्ध असलेल्या 10, 20 रुपयांच्या नोटा अनेकदा फाटक्या, तुटक्या, चिटकवलेल्या किंवा जीर्ण अवस्थेत असतात. अशा नोटा काही दिवसांतच वापरायोग्य राहत नाहीत. व्यापारी वर्गाला यामुळे मोठी पंचाईत सहन करावी लागत आहे. तर ग्राहकांनाही अशा नोटा सांभाळणे अवघड झाले आहे.

रोख व्यवहार करताना फाटक्या नोटांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. फाटलेल्या नोटा चिटकवून वापरताना ग्राहक-व्यापारी यांच्यात वाद-हमरीतुमरीच्या घटना घडतात. बँकांमध्येही अशा जीर्ण नोटा सहजासहजी स्वीकारल्या जात नाहीत. कमी उत्पन्न गटातील लोकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. काहींना नुकसानही सोसावे लागते. स्टेट बँक व इतर बँकांमध्ये जीर्ण नोटा बदलण्याची सोय असली तरी सततची गर्दी पाहता सामान्य नागरिक त्या भानगडीत पडत नाहीत. दरम्यान 1, 2, 5, 10 व 20 रुपयांची नाणी नोटांना पर्याय म्हणून वापरली जातात. मात्र बाजारात या सुट्या चिल्लरचाही तुटवडा जाणवू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT