दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी डॉ. संपदा मुंडे यांनी जीवन संपविले
सुसाईड नोटवरून दि. 25 रोजी घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकरला अटक
दि. 25 रोजी रात्री फौजदार गोपाळ बदनेला अटक
डॉ. संपदा मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील कवडगावात शनिवारी 25 रोजी अंत्यसंस्कार
राहुल गांधी यांचे ट्विट व मोबाईलवरून पीडित कुटुंबाशी संवाद
रूपाली चाकणकरांच्या विधानांवरून गदारोळ
उदयनराजेंकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी
विरोधी पक्षांकडून दिल्लीसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलने
शुक्रवार, दि. 31 रोजी अखेर मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीची स्थापना
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी महिला आयपीएस अधिकार्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. एसआयटीची टीम फलटणमध्ये लवकरच दाखल होणार असून डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या तपासाला आता गती येणार आहे.
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधून घेणार्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण सरकारनेही गांभीर्याने घेतले आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर सर्वत्र जोरदार काहुर उठले. या आत्महत्या प्रकरणात दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. मात्र, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात विरोधी पक्षाने जोरदार राळ उठवली आहे. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले. नुकतेच त्यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांची मागणी जाणून घेतली होती. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सलग पत्रकार परिषदांचा सपाटा लावून दररोज वेगवेगळे गौप्यस्फोट केले. एसआयटी स्थापन करण्याची मागणी जनतेतूनच होऊ लागली होती. जनतेच्या वाढत्या दबावानंतर आणि विविध स्तरातून येणार्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
फडणवीस यांनी फलटण येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये रणजितसिंह यांना ‘क्लीन चिट’ दिली होती. त्यानंतरही विरोधकांचे आरोप चालूच राहिले. या परिस्थितीमध्ये भाजपच्या माजी खासदारांभोवतीच ‘चक्रव्यूह’ रचल्याचे समोर आले. स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेत फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार विशेष तपास पथकाचे नेतृत्व एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी पोलिस अधिकारी, गुन्हे अन्वेषण तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक सल्लागारांचा समावेश आहे. या पथकाला सर्व संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि तपास नोंदींचा सखोल अभ्यास करून वास्तव परिस्थिती उघड करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
राज्यभरातील नागरिक, महिला संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचा विश्वास आहे की, एसआयटीच्या चौकशीनंतर या प्रकरणातील सर्व गोष्टी प्रकाशात येतील आणि दोषींना शिक्षा होईल.
एसआयटी स्थापन झाल्यानंतर पुढील काही दिवसांत ती फलटण येथे येऊन घटनास्थळाचा तपास करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डॉ. संपदा मुंडे प्रकरणाने समाजातील अनेक स्तरांना हादरा दिला असून आता एसआयटीच्या तपासातून सत्य उजेडात येण्याची सर्वसामान्य जनतेची अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर दै. ‘पुढारी’ने पहिल्या दिवसापासून सत्यशोधक पत्रकारिता केली. या प्रकरणाचे सर्व अँगल दै. ‘पुढारी’ने जनतेसमोर मांडले. बीड जिल्ह्यातील एक युवती सातारा जिल्ह्यात येऊन आरोग्यसेवा बजावते. तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यावरून सर्व बाजूने रान उठले असताना या प्रकरणाचे वास्तव समोर येणे आवश्यक असल्याने दै. ‘पुढारी’ने या प्रकरणात सडेतोड वार्तांकन केले. या प्रकरणात एक पोलिस अधिकारीच संशयित आरोपी असल्याने या प्रकरणाचा एसआयटीमार्फत होण्याच्या द़ृष्टीने दै.‘पुढारी’ने पाठपुरावा केला. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात एसआयटी नेमून एकप्रकारे सत्यशोधनाच्या प्रक्रियेत एक पाऊल पुढे टाकले. त्यामुळे दै. ‘पुढारी’च्या या पाठपुराव्याबद्दल सातारा जिल्ह्यतील जनतेतून दै. ‘पुढारी’चे कौतुक होत आहे.