बामणोली परिसरात पडत असणार्‍या संततधार पावसाने शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.  Pudhari File Photo
सातारा

शिवसागर जलाशयाच्या पातळीत लक्षणीय वाढ

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या कास-बामणोलीसह कांदाटी खोरे या संपूर्ण परिसरात पावसाची संततधार सुरू असून शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धुवाधार पाऊस कोसळत असल्यामुळे डोंगरदर्‍यातील छोटे मोठे धबधबेही जोरात कोसळू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी थोडीफार विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पश्चिमेकडील बामणोली, तापोळा भागात जोरदार बरसात सुरू केली आहे. या संपूर्ण परिसरामध्ये संततधार सुरू असून ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून भात लावणीसह इतर शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गावानजीक ज्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी तर आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. संततधार कोसळणार्‍या पावसाने शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दुसरीकडे, सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव हा गेल्या काही दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण परिसरात पडणारा पाऊस कासच्या सांडव्यावरून खूप मोठ्या प्रमाणावर वाहत आहे.

शिवसागर जलाशयाची पाणी पातळी वाढल्याने बोटिंग व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे दळणवळण देखील सोयीचे झाले आहे. आता सुरू असणारा पाऊस असाच कोसळत राहिल्यास शिवसागर जलाशयाची पाणी पातळी आणखीन वाढून कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होणार आहे.

पर्यटकांना कासच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन

कासच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही पर्यटकांनी या परिसरातील धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कासच्या सांडव्यामध्ये पर्यटनासाठी जाणारे पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यामध्ये वाहून जाण्याचा धोका आहे. पाण्याचा फ्लो वाढल्याने वजराई धबधब्यालादेखील खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT