सातारा

म्हसवडच्या सिद्धनाथाचा आज रथोत्सव

दिनेश चोरगे

म्हसवड; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथ उत्सव यात्रा बुधवार, दि. 13 डिसेंबर रोजी सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये 'सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषणात संपन्न होत आहे. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. चार-पाच वर्षांनंतर यंदा रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी माणगंगा नदीपात्रातून नेला जाणार आहे. त्यामुळे म्हसवडकर तसेच भाविक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच त्यांचा सर्व कर्मचारीवर्ग सिद्धनाथ रथोत्सवास येणार्‍या भाविकांची कसलीही गैरसोय होणार नाही, यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पाळणे तसेच इतर खेळाचे साहित्य आले आहे. मनोरंजनासाठी खेळणी, तमाशा, फिरते सिनेमागृह, खाद्यपदार्थांच्या दुकानाची रेलचेल, कटलरी, बांगड्या, लहान मुलांची खेळणी, हळदी-कुंकू, हॉटेल, चायनीज, कंदी पेढे, मेवामिठाई आदी व्यावसायिकांची दुकाने, खेळणी आदी दुकाने थाटली आहेत. सिद्धनाथ मंदिरामध्ये सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या दर्शनासाठी चोख नियोजन केले आहे. मंदिरातील दर्शनबारीमुळे भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी असणार्‍या प्रवेशद्वाराच्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार केल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करणे किंवा दर्शन घेऊन बाहेर येता येणे सोयीचे होणार आहे. तसेच संपूर्ण मंदिरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यावेळी माणगंगा नदीला पाणी नसल्याने नदीपात्रात दोन तमाशा मंडळे येणार आहेत, तर सिनेमाही अनेक वर्षांनंतर यात्रेत येत असल्याने नागरिकांना मनोरंजनाचे साधन यात्रेत उपलब्ध झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. यात्रा मोठ्या प्रमाणात व जास्त दिवस रहावी यासाठी राजेमाने परिवाराने कृषी प्रदर्शन भरवले आहे.

नगरपालिकेने संपूर्ण रथ मार्गाचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे. तसेच सातारा-पंढरपूर या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवून शहराच्या सौंदर्यात भर टाकली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी बंदोबस्ताबरोबर पार्किंग, मंदिरातील तसेच यात्रा पटांगणावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. प्राथमिक आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरूपात चेतना बझार शेजारी, बसस्थानक यात्रा पटांगणांवर दवाखाने उभे केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT