म्हसवड : लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ-जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री 12 वाजता धार्मिक विधीपूर्वक, पारंपरिक पध्दतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
तब्बल महिनाभर चालणार्या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकारी रामचंद्र गुरव यांच्या हस्ते आरती करुन मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसाचे घट उठवण्यात आले. घट उठवल्यानंतर 12 दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले. या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते, अशी अख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे. या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसवण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसवण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी वर सज्ज झाला. नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, ऊसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सजवण्यात आला होता. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील मोकळ्या मैदानात पंचक्रोशीतील, खेड्यापाड्यातील भाविकांचा गजी- ढोलाचा कार्यक्रम अखंड सुरु होता.
श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकर्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभार्यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गभार्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत होते आणि सालकर्यांसह श्रींची मूर्ती आतील गाभार्यात विवाहाप्रित्यर्थ नेण्यासाठी पुजारी मंडळी पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत होते. श्रींची मूर्ती गाभार्यात नेल्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपरिक पध्दतीने मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री 12 वाजता थाटात संपन्न झाला. पारंपरिक रिवाजानुसार श्रींच्या विवाहसोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह संपन्न झाला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविकिरण गुरव, उपाध्यक्ष गणेश गुरव, वैभव गुरव, सर्व विश्वस्त, सागर गुरव, मार्तंड गुरव, बजरंग गुरव, अजित गुरव, हरिभाऊ गुरव, महेश गुरव, सचिव दिलीप कीर्तने, श्रींचे मानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, मानाच्या करवल्या, उपस्थित होत्या.
श्रींच्या विवाहानंतरची वरात म्हणजे श्रींची रथयात्रा. ही रथयात्रा शुक्रवार दि.21 नोव्हेंबर रोजी होणार असून या दिवशी तब्बल एक महिना चालणार्या श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे. या रथयात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक आवर्जून उपस्थित असतात. श्रींचा विवाह मंदिराच्या गाभार्यात संपन्न होतो. त्यामुळे बाहेरील भाविकांना तो पाहता येत नाही,ही अडचण ओळखून देवस्थान ट्रस्टने हत्ती मंडपाच्या पाठीमागे मोठ्या पडद्यावर हा सोहळा सर्वांना पाहता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. भाविकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.