सातारा : आषाढ महिन्याची सांगता होवून श्रावण मास प्रारंभ होत आहे. अध्यात्म व धार्मिक कार्यासाठी श्रावण महिन्याला विशेष प्राधान्य राहते. त्यामुळे श्रावणात सण समारंभ व व्रतवैकल्यांची रेलचेल वाढणार आहे. उन पावसाचा खेळ अन् निसर्ग सौंदर्याला बहर यामुळे ‘श्रावण मासी हर्ष मानसी... हिरवळ दाटे चोहीकडे’ या ओळी प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहेत.
सण समारंभांचा महिना म्हणून श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. आजपासून श्रावण महिना सुरू होत असून व्रतवैकल्यांची रेलचेल वाढणार आहे. श्रावणात सोमवार व शनिवारी उपवास व श्रावण व्रत केले जाते. श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो. शुक्रवार दि. 25 जुलै रोजी श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावणास सुरुवात होणार असून, दि. 23 ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येने याचा समारोप होणार आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी याकाळात भक्त पूजा विधी आणि व्रत करतात. श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते.
आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात. शनिवारी शनी, मारुतीची भक्ती केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शिवमंदिरे दर सोमवार व शनिमंदिरे दर शनिवार भाविकांच्या गर्दीने गजबजणार आहेत. जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर, नागनाथ वाडी, संगम माहुली, क्षेत्र महाबळेश्वर, लिंबचे कोटेश्वर, यवतेश्वर, पाटेश्वर, जरंडेश्वर, मेरुलिंग यासह विविध शिवमंदिर परिसरांमध्ये श्रावणी यात्रा भरणार असल्याने भाविकांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. या वर्षी श्रावणात चार सोमवार व पाच शनिवार येत असून उपासनेसाठी हा महिना शिवभक्त व हनुमान भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. व्रत वैकल्यांमुळे फळे, फुले, बेलपत्रांची मागणी वाढणार आहे.
दरम्यान, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सोमवार, शनिवारच्या व्रताबरोबरच श्रावणी हळदी-कुंकू समारंभ, श्रावणी सत्यनारायण महापूजा तसेच आपत्य सुखासाठी गुरुवार, शुक्रवारचे उपवास आदि धार्मिक कार्यक्रम व व्रत वैकल्याची रेलचेल राहणार आहे. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन हे सणही उत्साहात साजरे होणार आहेत. आगामी काळातील निवडणुकांमुळे श्रावणातील समारंभाना राजकीय किनार लाभणार आहे.
श्रावणात व्रत वैकल्यांमध्ये उपवासाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शाबू, वरी, शेंगदान, खजूरासह फराळाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. अनेकजण रेडीमेड उपासाची भाजणी, राजगिरा लाडू, चिक्की आदिंची खरेदी करतात. मंदिरामध्येही अन्नदान, प्रसादात फळे व उपासाचे पदार्थच वाटले जातात.त्यामुळे बाजारपेठेत श्रावणात फराळाच्या पदार्थांमधून आर्थिक उलाढाल वाढणार आहे.