शिवजयंतीनिमित्त राजधानी सातार्‍यात राजवाडा येथे ऐतिहासिक मिरवणुकीचा शुभारंभ करताना ना. शिवेंद्रराजे भोसले. समवेत हरिष पाटणे, अमोल मोहिते व इतर. Pudhari Photo
सातारा

राजधानी साताऱ्यात अवतरली शिवशाही

शिवप्रेमींचा जल्लोष : केरळी लोकनृत्यासह टाळ-मृदंगाची भुरळ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शिंग तुतार्‍यांचा निनाद... टाळ-मृदंगाचा नाद... ढोल-ताशांचा गजर... फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याची भव्य मिरवणूक राजवाडा येथून काढण्यात आली. घोडे, हत्ती, उंट यासह केरळी लोकनृत्याने मिरवणूक मार्ग दणाणून सोडला. त्यामुळे राजधानीत शिवशाही अवतरली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती राजधानी, सातारा यांच्या वतीने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राजवाड्यापासून शिवतीर्थ (पोवईनाका) अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळपासूनच गांधी मैदानावर शिवप्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली. मोती चौक, चांदणी चौक, मोती तळे परिसर अलोट गर्दीने फुलून गेला. शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींसाठी गांधी मैदानावर केरळी पारंपरिक वाद्यांचे आयोजन करण्यात आले होते. केरळी वाद्यांनी शिवप्रेमींची मने जिंकली. टाळकर्‍यांनी केलेल्या गजरात सातारकर मंत्रमुग्ध झाले.

प्रचंड गर्दीमुळे मिरवणुकीचा माहोल तयार झाला. सायंकाळी 7.30 च्या सुमारास गोल बाग येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अभिवादन केले. त्यानंतर ना. शिवेंद्रराजे भोसले, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, अमोल मोहिते यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की... जय,’ ‘हर हर महादेव,’ जय श्रीराम अशा दिलेल्या घोषणांनी गांधी मैदान दुमदुमून गेले. वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी असलेले हत्ती, घोडे, उंट मिरवणुकीचे आकर्षण ठरले. केरळी लोकनृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. केरळी लोकनृत्य सादर करणार्‍या कलावंतांसोबत सेल्फी घेण्याचा मोह सातारकरांना आवरला नाही. ही मिरवणूक राजवाडा-मोती चौकातून राजपथावरुन कमानी हौद चौकमार्गे खालच्या रस्त्याने शेटे चौक-पोलिस मुख्यालय ते पोवईनाका अशी काढण्यात आली. चौकाचौकात फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत होती.

शिवतीर्थही शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेले होते. मिरवणुकीत मावळ्यांचे भवगे फेटे आणि पारंपरिक पोषाख लक्ष वेधून घेत होते. हत्ती, उंट, घोडे, ऐतिहासिक पोषाखातील मावळे, महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याने जणू काही शिवकाळच अवतरला होता. यावेळी अशोक मोने, ओंकार कदम, अविनाश कदम, शरद काटकर, राजू गोरे, रवी माने, मुकुंद आफळे, भालचंद्र निकम, अक्षय गवळी, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, शंकर माळवदे, अमित वाघमारे, प्रतिक्ष शिंदे, सूरज जांभळे, सुमित कठाळे, अ‍ॅड. नितीन शिंगटे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT