कण्हेर : भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्याचे चित्र बदलून या तालुक्याला विकासाची दिशा दिली. हा वारसा वेगाने पुढे नेला जात आहे. भाजपच्या माध्यमातून तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्याचा माझा मानस आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट करून सातारा तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
कळंबे ता. सातारा येथे गांव व परिसरातील विविध 23 कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सौ. सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, जितेंद्र सावंत, कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष महेश गाडे, शिवराम घोरपडे, दिलीप निंबाळकर, तात्यासाहेब वाघमळे, सुरेश टिळेकर, दादा शेळके, अमित लावंघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, भाजपच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे देऊन सर्वांना पक्षाने न्याय दिला आहे. येत्या निवडणुकीत सर्वांच्या एकीतून भाजपची ताकद दाखवून देऊ. निवडणूक आली की काही लोक संपर्कात राहून गाठीभेटींचा धडाका लावत आहेत. अशा लोकांना वेळेतच ओळखून त्यांच्या संधीसाधूपणापासून सावध राहिले पाहिजे.
सौ.सरिता इंदलकर म्हणाल्या, ना. शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून कळंबे गावाबरोबर परिसराचा विकासातून चेहरा मोहरा बदलला आहे. शिवेंद्रराजेंनी या परिसरातील जनतेची अहोरात्र सेवा करून त्यांची मने जिंकली आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला सभापतीपदाची मोठी संधी दिली. त्याचबरोबर प्रत्येक अडीअडचणीत शिवेंद्रराजे आमच्या पाठीशी भक्कमपणे राहत असून हीच आमची खरी ताकद आहे.
कार्यक्रमास सरपंच प्रवीण म्हस्के, उपसरपंच ॲड. विजय इंदलकर, दिलीप इंदलकर, मार्केट कमिटी संचालक रमेश चव्हाण, दादासाहेब बडदरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी इंदलकर यांनी केले. आभार प्रमोद इंदलकर यांनी मानले.