कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखान्यात शनिवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कारखान्याच्या स्टोअर गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास शिवनेरी शुगर कारखान्याच्या स्टोअर गोदामातून अचानक काळ्या धुराचे लोट बाहेर येताना दिसले. याची माहिती मिळताच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाहणी केली असता गोदामात आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती त्वरित युनिट प्रमुख राम पाटील यांना देण्यात आली. आगीचे लोट वाढत असल्याने कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगार घटनास्थळी जमा झाले. कारखान्यात उपलब्ध असलेल्या लहान अग्निशमन युनिट्स व पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, शिवनेरी शुगरचे जनरल मॅनेजर राम पाटील व मॅनेजर दीपक पाटील यांनी रहिमतपूर येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण केले. अग्निशमन दलाने सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
या आगीत स्टोअर गोदामात साठवलेले कारखान्यासाठी अत्यावश्यक असलेले किमती इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महत्त्वाचे स्पेअर पार्ट्स तसेच इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे जयपूरसह पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, कारखान्याच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.