सातारा : जिल्ह्यात 9 नगरपालिका व एका नगरपंचायतीचे धूमशान सुरू झाले असतानाच, महायुतीतील नेत्यांमध्येच भडका उडाला आहे. मेढा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या भाजप व शिवसेनेच्या मेळाव्यात त्याची ठिणगी पडली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमचा स्वाभिमान दुखावल्यास शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा इरादा व्यक्त करताच, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. पाटण नगरपंचायतीत घ्याल तोच निर्णय मेढा नगरपंचायतीत होईल, असे ठणकावत त्यांनी शतप्रतिशत भाजपचाच एल्गार पुकारला. दरम्यान, यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली असून, जिल्ह्यात महायुतीत आलबेल नसल्याचेच चित्र दिसून आले.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे मित्रपक्ष केंद्र आणि राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर महायुतीचे धोरण आता फ्लॉप ठरू लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. एका बाजूला भाजपचे शतप्रतिशत भाजप असे धोरण सुरू आहे. तर दुसर्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी देखील जिल्ह्यामध्ये आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी झुंज सुरू केली आहे. अशातच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये खटके उडू लागले आहेत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातार्यात शासकीय विश्रामगृहावर महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती; मात्र या बैठकीकडे भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींनी पाठ फिरवली होती.
तेव्हाच दैनिक ‘पुढारी’ने महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट केले होते. आता हेच वास्तव पुन्हा पुन्हा समोर येताना दिसत आहे.
मेढा नगरपंचायतीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी मेढ्यामध्ये शिवसेनेचा मेळावा घेतला होता. जावलीतील मातीत आजही शिवसेना रुजलेली पाहायला मिळत आहे
त्यामुळे येथील स्वाभिमानी शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, असा सज्जड इशारा देत त्यांनी स्वबळावर लढण्याचा इरादा व्यक्त केला.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांनीही लगोलग मेढ्यात भाजपच्या मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या वक्तव्याची परतफेड केली. ना. शंभूराज देसाई यांनी मेढ्यात येऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कमी लेखू नये, असे म्हटले होते. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही कुणालाच कमी लेखत नाही. आमची ताकद आहे म्हणून आम्ही काम करत आहोत. निवडणुका आल्या म्हणून आम्ही जनतेसमोर आलेलो नाही. जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आणि त्यांच्या कामासाठी आम्ही नेहमी एकत्र येत असतो, असा चिमटा यावेळी त्यांनी काढला. शंभूराज देसाई हे आमच्यापेक्षा अनुभवी आहेत. त्यांचे अनुकरण आम्ही करत आहोत आणि इथून पुढे देखील करणार. पालकमंत्र्यांनी आधी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय घ्यावा. जो निर्णय पाटणमध्ये होईल, तोच निर्णय मेढ्यात देखील होईल, असे म्हणत मेढ्यात भाजप कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही, हे स्पष्ट केले.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र असून आगामी काळात वातावरण आणखी टाईट होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये आमचा पक्ष आहे; पण आमचा कुणी स्वाभिमान दुखावणार असेल व महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचार केला गेला नाही तर स्वबळावर संपूर्ण ताकदीनिशी लढून मेढा नगरपंचायत व पंचायत समितीवर माझे शिवसैनिक भगवा झेंडा फडकवतील. तो फडकवण्यासाठी मी सर्वतोपरी ताकद शिवसैनिकांना या पुढील काळात देईन.शंभूराज देसाई, पालकमंत्री
महायुतीमध्ये आम्ही घटक पक्षांना कमी लेखत नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई हे आमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने देखील मोठे आहेत. ते आमच्या आधी मंत्री झालेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील ते मंत्री होते आणि आताही आहेत. आम्ही आतापर्यंत त्यांचेच अनुकरण करत आलो आहोत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीबाबत निर्णय घ्यावा. तोच निर्णय मेढ्यात होईल.ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री