Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale: मोदींच्या सूचनेपूर्वीच शिवेंद्रराजेंकडून बचतीचा आदर्श

ना सायरन, ना लवाजमा : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर नेतेमंडळी अनुकरण करू लागले असले तरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्या क्षणापासूनच लवाजम्याला फाटा दिला आहे. आपल्या ताफ्यातील एका गाडी व्यतिरिक्त कोणतीही गाडी पुढे-मागे न ठेवणाऱ्या शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या काल केलेल्या आवाहनालाही प्रतिसाद देण्याची ग्वाही दिली आहे.

मंत्री झाल्यावर अनेकांना गाड्या दांडलण्याची हुकी येते. ठो-ठो सायरन वाजवत अनेक मंत्री राज्यात सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असे वागत असतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यावर शिवेंद्रराजेंनी अशी कोणतीही कृती केली नाही. त्यांनी लवाजमा नाकारला. मोठमोठ्या गाड्याही ताफ्यातून बाजुला काढल्या. स्वत:च्या गाडीसोबत जिल्हा पोलिस प्रमुखांनी खुप आग्रह केल्यामुळे एक गाडी त्यांनी ताफ्यात ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच साधेपणाने वागण्याच्या सूचना केल्यानंतर अनेक मंत्री अनुकरण करत आहेत. मात्र, शिवेंद्रराजेंनी हा आदर्श स्वत:च्या कृतीने घालून दिला आहे.

यासंदर्भात बोलताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही मोठ्या ताफ्याचा मोह कधीही नव्हता. शपथविधीनंतर पाठवलेल्या सरकारी गाड्याही लगेच परत केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या विचारांना पुढे नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत सामान्य व जबाबदार जीवनशैली जपण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री झाल्यानंतरही मी वाहनांचा ताफा स्वीकारला नव्हता.तरीही साताऱ्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी दोन वाहने सुरक्षेसाठी दिली होती. माझ्या सोबत असलेल्या ताफ्यात माझी गाडी व दुसरी पोलिसांची गाडी असते. मी कधीही ताफ्यात अतिरिक्त वाहनांची मागणी केली नाही. माझी गाडी पेट्रोल व इलेक्ट्रीकवर चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर इंधन बचतीबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्या आहेत.

कॉन्व्हायमधील वाहने कमी करावेत, परदेशी दौऱ्यावर मर्यादा, सरकारी खर्च कमी करणे आदि सुचना केल्या आहेत. नेटवर्क कनेक्टीव्हिटी ग्रामीण भागात कमी असते.त्यामुळे मंत्र्यांच्या बैठका आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT