सातारा : खा. उदयनराजे आणि मी एकच असून आमचा पक्षही एकच आहे. तुम्हीही एकाच पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात हे लक्षात ठेवा. विषयपत्रिकेवरील विषय सोडून बाकीचे विषय मांडण्याचे सभागृह हे ठिकाण नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच ज्येष्ठ नगरसेवकांशी बोलताना भाषा नीट वापरा. पुन्हा असा प्रकार घडला तर खपवून घेणार नाही. एकमेकांच्या अंगावर माणसे सोडण्याचे प्रकार बंद करा. नगरपालिकेत कोण काय करतंय, हे मला चांगलं माहित आहे. सभागृहाची शिस्त कुणी मोडली तर नगराध्यक्षांनी सरळ कारवाई करावी, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नगसेवकांना झापडले.
साताऱ्यात सुरूचिवर रविवारी दुपारी पार पडलेल्या बैठकीत ना. शिवेंद्रराजे भोसले यांची आक्रमक एन्ट्री झाली. त्यांनी आल्या आल्या कोण नगरसेवक बैठकीला गैरहजर आहेत त्यांना फोन लावून तातडीने बोलावून घ्या, असे फर्मान सोडले. ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मागील सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर कुणीही कुणाची उणीदुणी काढू नका, अन्यथा सभांना मी येईन, असे सांगितले होते. आताच्या सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जे घडले ते अत्यंत चुकीचे झाले.
विषयपत्रिकेवरील विषय सोडून बाकीचे विषय मांडण्याचे सभागृह हे ठिकाण नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच ज्येष्ठ नगरसेवकांशी बोलताना भाषा नीट वापरा. पुन्हा असा प्रकार घडला तर खपवून घेणार नाही. ज्येष्ठ नगरसेवकांशी बोलताना भाषा नीट वापरा, अशा शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली.
तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे आम्हाला पक्षाच्या वरिष्ठांना उत्तरे द्यावी लागतात. अशा प्रकारांची विचारणा पक्षपातळीवर होते. ते खासदार आहेत, मी आमदार म्हणून काम करतो. आम्ही दोघेही एकच असून आमचा पक्षही एकच आहे. दोघांचेही मनोमिलन आहे. तुम्ही काहीही केलं तरी एकाच पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात हे लक्षात ठेवा. मी बाकीच्या बाबींवर उदयनराजेंशी चर्चा करणार आहे. नव्या नगरसेवकांना अडचणी असतील तर अविनाश कदम, रवींद्र ढोणे, जयवंत भोसले, धनंजय जांभळे या जुन्या नगरसेवकांची मदत घ्या. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, पक्षप्रतोद यांनीही सर्व नव्या नगरसेवकांना मदत करावी. सर्व नवे नगरसेवक व प्रशासनाची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल. आम्हाला पुढे निवडणुकांना सामोरे जायचे आहे. सातारा शहरातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्या. सातारा शहरात पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचनाही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्या.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शिक्षण सभापती शंकर किर्दत, नगरसेवक रवींद्र ढोणे, जयवंत भोसले, राजू गोरे, फिरोज पठाण, अक्षय जाधव, विजय देसाई, बाळू खंदारे, आशा पंडित आदि उपस्थित होते.