खा. श्री. छ. उदयनराजे भोसले  File Photo
सातारा

Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजे सध्या बिझी; मनोमिलनाबाबत तेच निर्णय घेतील : खा. उदयनराजे

निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : मी स्थानिक पातळीवर कधीही राजकारण करत नाही. आजपर्यंत मी नेहमी समाजकारण केले आहे. कोणालाही बाजूला सरकवण्याचा मी कार्यक्रम केला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सध्या बिझी आहेत. त्यांच्यासोबत पक्षचिन्ह की आघाडी यावर चर्चा करू. निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आता यापुढील निर्णय ना. शिवेंद्रराजे यांनी घ्यावा, असे सांगत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाचा चेंडू ना. शिवेंद्रराजे यांच्या कोर्टात टोलवला.

कास तलावाच्या ओटीभरण कार्यक्रमानंतर पत्रकारांशी खा. उदयनराजे बोलत होते. राज्यातील बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसास्थळाच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, गडकोट किल्ल्यांचे पावित्र्य आणि तेथील ऐतिहासिक संदर्भ जपणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे, अन्यथा गडकोट किल्ल्यांचे आणि वारसास्थळांचे विद्रुपीकरण करणार्‍या प्रवृत्ती वाढतील.

वारसास्थळांची प्रक्रिया ही अत्यंत वेळखाऊ असते. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. किल्ल्यांची जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आता वाढली आहे. त्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी तसेच शासनाने समनव्याने या वारसास्थळांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे.

विधानसभेच्या आवारातील मारामारी अयोग्य...

विधानसभेच्या आवारात आ. गोपीचंद पडळकर व आ. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारामारीबाबत खा. उदयनराजे म्हणाले, आपण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत, लोकांना आपल्याकडून अपेक्षा असतात. आपल्याकडून विकासकामे तसेच आपले सामाजिक जीवनातील वर्तन याविषयी लोकांचा विरस झाला तर आपल्या प्रतिनिधीत्वाला अर्थ उरत नाही. विधानसभेच्या आवारात अशाप्रकारचे वर्तन आमदारांनी करू नये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र त्या चर्चेचे स्वरूप मारामारीपर्यंत जाऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT