सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सातारा व जावली तालुक्यात माझे एकगठ्ठा मतदान असतानाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनेनुसार काम केले. भाजप आणि मुख्यमंत्र्यांपलिकडे मला काहीही माहित नाही. बँकेच्या चेअरमन निवडीबाबत झालेल्या पहिल्या बैठकीपासून मी आ. धैर्यशील कदम सोबत होते. मी कुठेही परस्पर कुणाला भेटून चर्चा किंवा बैठका केल्या नाहीत. निवडणुकीचा निकाल लागल्यावर माझा कुठेही उल्लेख झाला नाही. झालं की आमच्यामुळं आणि नाही झालं की बाबांना जाऊन विचारा असं कसं? असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेअरमन-व्हाईस चेअरमन निवडी झाल्या. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत भाजप सत्तेबाहेर गेले, याबाबत विचारले असता मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माझ्याकडे वरिष्ठांनी दिलेले निरोप महायुतीतील घटक पक्षांकडे पोहोचवले होते. घटकपक्षांचे निरोपही मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवले. बुधवार सकापर्यंत ज्या सुचना, निरोप आले ते युतीतील मित्रपक्षांच्या नेतृत्वांना दिले होते. यापद्धतीने पुढे जाण्याचे ठरले असल्याचे सांगितले होते. मात्र तसा निर्णय झाला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र निर्णय घेऊन निवड केली. याबाबत युतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी व सेनेने एकतर्फी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष निवड प्रक्रियेत मी नव्हतो. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कसा झाला हे शिवेंद्रबाबांनाच विचारा असे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, याकडे लक्ष वेधले असता मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, भाजपकडून तुम्ही बोलणी करावीत असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले होते. महायुतीतूनच निवडणूक लढा. कुठेही वाद-विवाद, कटुता निर्माण होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेण्याच्या त्यांच्या स्पष्ट सुचना होत्या. मला पहिल्यापासून काही गोष्टींचा अंदाज होता. त्यामुळे पहिल्या बैठकांना मी आ. धैर्यशील कदम यांना घेऊन जात होतो. मी परस्पर कुठल्याही बैठका केल्या नाहीत किंवा कुणालाही मी गुपचूप भेटलो नाही. कुणाशीही परस्पर तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला नाही.
सातारचे एकगठ्ठा मतदान माझ्या विचाराचे असतानाही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनेनुसार आम्ही माघार घेतली. निवडणुकीत मात्र आमच्या उमेदवारांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाले, ही वस्तुस्थिती असून या गोष्टी बाहेर आल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते मी मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील व इतरांच्या कानावर घातलं. अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय त्यांनी केला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यावर माझा कुठेही उल्लेख झाला नाही. मी काय चुकत नाही. मग झालं नाही की माझं नाव कसं पुढे येतं? मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याला हे करायचं आहे, असं म्हटल्यावर आम्ही का? कशाला? असे न म्हणता, भाजप, मुख्यमंत्री आणि युती म्हणून काम केले. माझा अंतिम शब्द मुख्यमंत्र्यांकडचा आहे. झालं की बाकीचे बोलायला आणि सांगायला पुढे येतात आणि नाही झाले की आमचा काही संबंध नाही शिवेंद्रराजेंना जाऊन विचारा ही भूमिका योग्य नाही, असे मला वाटते. काही गोष्टी न बोलता मिळतात आणि गोष्टी आपण बोलून घालवतो, एवढं मला कळतं, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
तुमच्याकडे एकगठ्ठा मते असतानाही तुम्ही रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी जयकुमार गोरेंच्या हट्टापायी अविनाश कदमांना अर्ज काढून घ्यायला लावला. गोरे तुमच्यावर एवढे नाराज का? असे विचारले असता मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले, मी जिल्हा परिषदेला पक्ष म्हणून उमेदवार निवडून आणले. संघर्षात पक्ष म्हणून ताकद लावली. आपले संख्याबळ असल्याने झेडपीला अध्यक्ष झाला पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा असताना आम्ही बरोबर होतो. त्यांची नाराजी का आहे त्यांनाच विचारा असे ते म्हणाले.
तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न झाल्याने जिल्हा बँकेत भाजपचा चेअरमन होऊ शकला नाही का? याबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्हा बँकेत माझ्या विचाराचे सातारा आणि जावलीतून तिघेजण निवडून आले आहेत. त्यांनी कुठेही काही केलेले नाही. निवडणुकीत आम्हाला जे दिसले, जाणवले त्यामध्ये माझ्या उमेदवारांविरोधात प्रचार झाला, ही वस्तुस्थिती आहे. तरीही युती म्हणून काम केले. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी असे वाटते. एकतर्फी त्यांनी निर्णय घेतला आहे. बँकेत चुकीचे काही होत असेल तर आक्षेप घेणे योग्य पण बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तर चांगली बँक अडचणीत येईल. सध्या मी संचालक नाही. २१ संचालकांपेक्षा जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे जीवनमान या बँकेवर आहे. शेती, शेतकर्यांच्या मुलांचे शिक्षण, सोसायट्या, साखर कारखाने हे जिल्हा बँकेच्या ताकदीवर चालले आहे. चुकीचे तेथे आक्षेप घ्यावा पण राजकारणातील हेवेदावे करण्यासाठी बँकेचा वापर होऊ नये. चुकीचे प्रकार सुरू असतील तर ते थांबवावेत, असे त्यांनी सांगितले.
टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतो या विधानाचा जिल्हा बँकेशी संबंध आहे का? असे विचारले असता मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले, माझे हे विधान सातारा व जावली तालुक्यांशी संबंधित होते. त्याचा जिल्हा बँकेशी किंवा जिल्ह्यातील इतर नेत्यांशी संबंध नाही. आम्हाला संपवायला काहीजण बाहेरून मुंबईहून आले आहेत. त्यांच्यासाठी हे विधान होते. जिल्ह्यातील नेत्यांनी हे विधान स्वत:ला लावून घेऊ नये, असे त्यांनी सांगितले.