सातारा : दादासाहेब, तुम्ही घाटवणच्या आई घाटाई देवीला जाता; पण आम्हाला नेत नाही असे मंत्री. शिवेंद्रराजे खा. उदयनराजे यांना म्हणाले. त्यावर उदयनराजे म्हणाले, आमचे लोकेशन ट्रॅप करून या. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, तुमचे लोकेशन मिळणे अवघड आहे. तुम्ही आत्ता येथे तर थोड्या वेळात दुसरीकडे असता. त्यामुळे गुगलपण तुमचे लोकेशन ट्रॅप करू शकत नाही, असा हसत-हसत चिमटा काढला.
सातारा नगरपालिका सभेतील राड्यानंतर उदयनराजे यांनी जलमंदिर निवासस्थानी व सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे यांनी सुरुची या निवासस्थानी संबंधित नगरसेवकांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या; पण हेवेदावे असल्याने यावेळी दोन्ही राजेंना जाणवले. त्यामुळे त्यांनी रविवारी सकाळी हॉटेल फर्न येथे पालिकेचे सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात दोघांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
बैठकीनंतर दोघे एकाच लिफ्टने खाली उतरले. बाहेर पडताना दोघांनी एकमेकांना आता दौरे कसे आहेत, याबाबत विचारपूस केली. त्यावेळी शिवेंद्रराजे यांनी तुम्ही एकटेच आई घाटाई देवीला जाता, आम्हाला चला पण म्हणत नाही. त्यावर आम्ही कधी नाही म्हणालो, चला आता जाऊ. आमचे लोकेशन ट्रॅप करून यायचे असे उदयनराजे म्हणाले. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, दादासाहेब, तुमचे लोकेशन मिळणे अवघड आहे. तुम्ही आत्ता येथे तर थोड्या वेळात दुसरीकडे असता. त्यामुळे आम्ही सोडा; पण गुगलपण तुमचे लोकेशन ट्रॅप करू शकत नाही, असे म्हणताच उदयनराजे हसले. आणि चला आता येतो, म्हणत निघून गेले.