सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा जलवा राजधानी सातार्यासह राज्यभर पहायला मिळाला. यानिमित्ताने विविध विधायक उपक्रम धडाक्यात राबवून सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करण्यात आली. राजधानी सातारा तर जल्लोषात न्हाऊन गेला.
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे राजधानी सातार्याला मोठे अप्रुप. रविवारी गुढीपाडव्याला बाबाराजेंचा वाढदिवस असल्यामुळे अवघं जनजीवन उत्साह व चैतन्याने भरून गेले. राजधानी सातार्यात तर अवघा माहोल बाबाराजेंमय झाला. वाद्यांच्या दणदणाटाने शाहूनगरी दणाणली. त्यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस मतदारसंघात समाजोपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. ना. शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देण्यासाठी सुरूची या निवासस्थानी समर्थकांनी अलोट गर्दी उसळली होती. कोटेश्वर मैदानावर तर शुभेच्छा देण्यासाठी जनसागर लोटला होता. सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. सकाळी सातार्यातील गारेचा गणपती मंदिरात जाऊन ना. शिवेंद्रराजेंनी दर्शन घेतले. त्यानंतर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भवानी मातेचे दर्शन घेतले. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले.
सायंकाळी 6 पासूनच कोटेश्वर मैदानाजवळील कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर ना. शिवेंद्रराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमू लागली होती. कार्यक्रमस्थळी ना. शिवेंद्रराजेंची ग्रँड एन्ट्री होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, कार्यक्रमस्थळी भव्य स्टेजवर ना. शिवेंद्रराजे यांनी जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. काही वेळाने सातारा शहर आणि उपनगरातील नागरिकांचे जथ्थे कार्यक्रमस्थळी दाखल होऊ लागले. दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते आणि शिवेंद्रराजेंप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. ना. शिवेंद्रराजेंचा जयजयकार करत कार्यकर्ते आणि नागरिक ना. शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देत होते. रात्री 8 च्या सुमारास मैदान खचाखच भरून गेले. माता, भगिनी, आबालवृद्धांसह अवघा जनसागर ना. शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता. यावेळी ना. शिवेंद्रराजेंसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत ना. शिवेंद्रराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील, चंद्रकांत बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री, राज्यातील अनेक आमदार, खासदार विविध पक्षाच्या नेते मंडळींनी आ. शिवेंद्रराजेंना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.