सातारा : सातारा पालिकेची निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छुक असून पक्षातील नेत्यांना, पदाधिकार्यांना विचारात घेऊन सक्षम उमेदवार दिले जातील. या निवडणुकीत समोर विरोधकांचे पॅनेल असणार हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपल्या विरोधात पॅनेल असू शकते. नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा हा धोका ओळखून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठकीत दिले. दरम्यान, विरोधकांनी सातार्यासाठी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सातारा पालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी भाजप व नगर विकास आघाडीच्या पदाधिकार्यांची बैठक हॉटेल लेक व्ह्यू येथे सोमवारी पार पडली. यावेळी दत्ताजीराव थोरात, प्रकाश गवळी, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब निकम, बाबाशेठ तांबोळी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ही बैठक कुणाच्याही विरोधात नाही. राजकीय काही घडवण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी, कुणावर कुरघोड्या करण्यासाठी किंवा कुणाची राजकीय कोंडी करण्यासाठी ही बैठक नाही. सातारा-जावली व सातारा शहरातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी ताकद लावल्यामुळे लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. सातारा लोकसभा मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर पहिला भाजपचा खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून निवडून आणला. मतमोजणी होईपर्यंत कुणीही या जागेबद्दल खात्री देत नव्हते. मात्र सर्वांनी ताकद लावल्यामुळे ही जागा जिंकण्यात आपण यशस्वी झालो. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही ताकद लावल्यामुळे सातारा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला झाला.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. भाजपला या निवडणुकीत फार मोठे यश मिळाले. पक्षाला ताकद दिली त्याची परत फेड सातार्याला दोन मंत्रिपदे देऊन भाजपने केली. तीन महिन्यांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. आठ दिवसांत नगरपालिका निवडणुकांची घोषणा जाहीर होईल, अशी शक्यता आहे. सातारा पालिकेची निवडणूक यापूर्वी कधीही पक्षाच्या चिन्हावर लढली गेली नाही. मागील निवडणुकांत नगर विकास आघाडी, सातारा विकास आघाडी, अपक्ष व कधी तिसरी आघाडीही झाली. निवडणुकांना समोरे जाताना मार्गदर्शन करणारे नेते आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर प्रमुख नेते, उदयनराजेंचे पदाधिकारी व दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नगरपालिका उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. उमेदवारीवरून सध्या कार्यकर्त्यांच्यात आपापसातच चर्चा सुरू आहेत. मात्र समोर काय सुरू आहे यावर कुणी विचार करताना दिसेना. निवडणुकीतील इतर धोके प्रत्येकाने विचारात घेतले पाहिजेत. त्यामुळे ही निवडणूक सोपी समजू नका. आपल्यात समन्वय राहिला नाही किंवा नीट नियोजन न केल्यास तिसरी आघाडी विरोधात उभी राहण्याची शक्यता आहे. सर्व आव्हानांना तोंड देऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. कुणाची ताकद कमी-जास्त यावर चर्चा करण्यापेक्षा समोर आव्हान निर्माण होणार असल्याने याचा इच्छुक उमेदवारांनी विचार करायला हवा. इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्यामुळे तिथेही इच्छुकांची गर्दी आहे. मात्र आव्हानांनाही तोंड द्यायचे आहे, याचा विसर पडू देऊ नका. या आव्हानांना कसे थोपवायचे, याचा प्रत्येक प्रभागात विचार झाला पाहिजे, असे ना. शिवेंद्रराजे म्हणाले.
येणारा काळ सातारा शहराच्या भविष्यासाठी उज्ज्वल आहे. चांगले करण्याची मानसिकता कायम ठेवली पाहिजे. ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी प्रभागातील जबाबदार नागरिकांना भेटावे व चर्चा करावी. अशा नागरिकांचा प्रभाव असतो, त्यांचे वजन असते. तरूण पिढी, महिला, नागरिकांचा किती पाठिंबा मिळतो, याचा संबंधितांनी अंदाज घ्यावा, अशी सूचना ना. शिवेंद्रराजे यांनी केली. ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ही बैठक घेण्यामागे वेगळे काहीतरी प्लॅनिंग करायचे आहे, कुरघोड्या करायच्या आहेत किंवा माझे घोडे पुढे दामटवायचे आहे, असे नाही. नवे -जुने असा भेदभाव पक्षात नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सर्व पदाधिकार्यांनी बसून चर्चा करावी. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी नियोजन करावे लागेल. सर्वसमावेश निर्णय घ्यावे लागतील. एकाच जातीचा नव्हे तर लोकांना अपेक्षित सर्व जाती-धर्माचे सर्वसमावेशक उमेदवार निवडून आणायचे आहेत, हे लक्षात घ्यावे. नगरसेवक अविनाश कदम, नगरसेवक अशोक मोने, सुवर्णा पाटील, विठ्ठल बलशेटवार यांची भाषणे झाली. यावेळी आजी-माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माझ्याच गल्लीतले, वॉर्डमधील काम झाले पाहिजे ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. कामे करताना गटर बंदिस्त करा, त्यासाठी पाईप टाका, त्यानंतर आणखी मोठी पाईप टाका असले प्रकार थांबले पाहिजेत. ज्यांना असले प्रकार करायचे आहेत त्यांनी आमच्यासोबत येऊ नये. हा पैसा, सातारकरांचा, सरकारचा आहे, अशा शब्दांत ना. शिवेंद्रराजे यांनी सुनावले.