शिवेंद्रराजे भोसले 
सातारा

Satara Politics| सत्ता, मंत्रिपद असताना सोळशी धरण का झाले नाही? : ना. शिवेंद्रराजे भोसले

शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार निशाना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाविकास आघाडीचे सरकार असताना कृष्णा खोरे विकास महामंडळ तसेच पालकमंत्रिपदाची जबाबदारी असतानाही सोळशी धरण का पूर्ण झाले नाही, असा थेट सवाल सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना केला. सत्तेत असताना धरण पूर्ण करता आले नाही आणि आता त्यावरून प्रश्‍न केले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

सोळशी धरणाच्या मुद्द्यावर शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सोळशी धरणाची प्रक्रिया केवळ भाषणापुरती मर्यादित राहिलेली नाही. युती सरकार या प्रकल्पाबाबत सकारात्मक असून सोळशी आणि बोंडारवाडी हे दोन्ही प्रकल्प सरकार पूर्ण करणार आहे. सोळशी धरण बांधण्याची मागणी शशिकांत शिंदे यांनी केली होती. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उरमोडी धरणाच्या पाण्याचा दाखला दिला. उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये पोहोचल्याने या भागातील शेतीचे चित्र बदलले आहे. आता या परिसरात ऊस शेती होऊ लागली असून अजिंक्यतारा कारखान्याच्या ऊसतोड टोळ्याही माण-खटावमधून ऊस आणत आहेत. सरकारने केलेल्या जलसिंचनाच्या कामांमुळे दुष्काळी भागातील शेतकरी बागायतदार होऊ लागला आहे, असे त्यांनी सांगितले.

सोळशी धरणाची प्रक्रिया सुरू असून बोंडारवाडी प्रकल्पही पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध मावळल्यानंतर हे प्रकल्प निश्‍चितपणे पूर्ण होतील. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी सरकार सकारात्मक असून केवळ आश्वासने न देता प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

कोयनेचे पाणी मुंबईला देण्याचा निर्णय योग्य

कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर समुद्राला जाणारे पाणी मुंबईकडे वळवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचेही ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT