ना. शिवेंद्रराजे भोसले  Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale : गुन्हेगारांसाठी पालकमंत्री आडवे का पडले?

शिवेंद्रराजे भोसले : अध्यक्ष निवड प्रक्रियेवर त्यांचाच दबाव

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपने 33 मते मिळवत बहुमत सिद्ध केले. दोन्ही मंत्र्यांना त्यांचे सदस्य सांभाळता आले नाहीत. आम्ही कुणाचेही सदस्य आणले नाहीत. त्यामुळे दंडेलशाही, लोकशाहीचा खून केला, हे भाजप व पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप साफ चुकीचे असून त्यामध्ये तथ्य नाही. पोलिस आणि पालकमंत्री यांच्यात काय प्रेम आहे आम्हाला माहीत नाही. जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने पार पडली. पोलिसी कारवाईत गुन्हेगारांना वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री आडवे का पडले? या निवड प्रक्रियेवर पालकमंत्र्यांचाच दबाव असावा, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. मनोज घोरपडे, आ. डॉ. अतुल भोसले, जि.प.चे उपाध्यक्ष राजू भोसले उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत पालकमंत्र्यांसह यश न आलेल्यांनी भाजपवर दंडेलशाहीचा आरोप, लोकशाहीचा खून झाला, असे बरेच आरोप केले असून त्यामध्ये तथ्य नाही. भाजप लोकशाही पद्धतीने या निवडणुकीला सामोरे गेला आहे. जिल्हा परिषद सभागृहात भाजपचे 32 सदस्य गेले. त्यांच्या मागे मी किंवा जयाभाऊ नव्हतो. स्वत:च्या गाडीतून भाजपचे सर्व सदस्य झेडपी सभागृहात गेले. आमच्या विचाराच्या काही सदस्यांना समोरच्यांनी दबावाखाली ठेवले. अशा सदस्यांनी सभागृहात विचारपूर्वक भाजपच्या बाजूने मतदान केले. भाजपने कुठल्याही सदस्याला भीती घातली नव्हती किंवा दबाव टाकलेला नव्हता. अपहरणाची तक्रार संबंधित सदस्याच्या मुलानेच केली असून, पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली.

अपहरण झालेली व्यक्ती ही तक्रारदाराचे वडील असून, त्यांचा भाजपशी संबंध नाही. भाजप हरला की लोकशाही जिंकली आणि भाजप जिंकला की दंडेलशाही केली किंवा निवडणुकीत भाजप हरला की मशिन चांगले आणि भाजप जिंकला की मशिन मॅनेज हे असे कसे? जिल्हा परिषदेत भाजपचे 28 सदस्य होते. तसेच आमच्या विचारासोबत काही सदस्य आल्याने जिल्हा परिषदेत आमची 33 मते झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आला. त्यांना त्यांचे लोक सांभाळता आले नाहीत किंवा त्यांच्यावर त्यांच्या सदस्यांचा विश्वास नसेल. त्यांचं त्यांनी बघावं. आम्ही कुणाचेही सदस्य आणले नाहीत. त्यामुळे दंडेलशाही, लोकशाहीचा खून केला हे भाजप व पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप साफ चुकीचे असून त्यामध्ये तथ्य नाही. भोसले म्हणाले, न्यायालय, पोलिस प्रशासन तसेच इतर मार्ग सर्वांनाच खुले आहेत. कुणी कुठे जाऊन दाद मागायची हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कुणावरही हल्ला केलेला नाही. पोलिसांनी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार कारवाई केली. त्याठिकाणी पोलिसांच्या वेशात दांडकी घेऊन तेथे आम्ही बसलो नव्हतो. पोलिसी कारवाईत गुन्हेगारांना वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांनी आडवे पडायला नको होते. पोलिसांनी रीतसर कारवाई करून निर्णय घेतला असता. पोलिसांनी कारवाई करताना त्यांचा काही विषय झाला असेल, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT