Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | जावलीतून मी काय जात नसतो : ना. शिवेंद्रराजे भोसले

मतदार संघ कसा टाकायचा हे आमचा नेताच ठरवणार

पुढारी वृत्तसेवा

मेढा : काही लोकांना असं वाटतंय, जावलीची पुनर्रचना होणार, बाबा जावलीतून बाहेर जाणार. त्यांना मी सांगू इच्छितो मी काय जावळीतनं जात नसतो. नवीन मतदार संघ पुनर्रचना कशी जरी झाली तरी आमचा नेता मुंबईमधला एवढा खंबीर आहे की जावली मतदारसंघ कसा टाकायचा याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे. तेव्हा आमच्या नादाला कुणीही लागू नये. आम्ही इथेच आहे आणि या जावलीमध्येच असणार आहे, असा सूचक इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.

कावडी ता. जावली येथे महिला सन्मान सोहळा व जिल्हा परिषद, पंचायत समिती नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, जावली पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, जिल्हा परिषद सदस्या हभप सौ.जयश्री गिरी, अजित साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावली बाजार समिती सभापती जयदीप शिंदे अभिनेत्री संजना काळे, अभिनेता संदीप पाठक, भाजपा तालुका अध्यक्ष संदीप परामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना.भोसले म्हणाले, जावलीकरांनी सगळ्यांनी मला ताकदीनं निवडून दिल्याने महाराष्ट्रात दोन नंबरच्या मताधिक्यानं मला विधानसभेमध्ये जाता आले. म्हणूनच आज हे पद आहे. तुमच्या बरोबरच मी कायम असणार एवढं सांगतो. येणाऱ्या काळात ज्या काही विकासात्मक योजना असतील त्या राज्य सरकारच्या माध्यमातून कावडी गावात राबविण्यात येतील, त्यासाठी आणखी निधी देऊ. तसेच येथील क्रीडा संकुलासाठी निधी देऊ.

डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, वसंतराव मानकुमरे यांचा अनुभव जिल्हा परिषदेमध्ये काम करण्यासाठी मार्गदशक असून कावडीचा कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मला मिळालेल्या संधीचे सोनं करून महिलांचे हात बळकट करण्यासाठी महिलांच्या योजना प्रभाविपणे राबविणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे म्हणाले, कावडी गावाला पहिल्या क्रमांकाचे पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणारच आहे. त्यासाठी पुनर्वसन झालेल्या गावाचे पुन्हा याच ठिकाणी गाव वसवले असून त्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांची साथ मिळाली. याभागात येणाऱ्या काळात पर्यटन वाढीसाठी तसेच रोजगार निर्मिती व उद्योगवाढीला प्राधान्य देणार आहे. या कार्यक्रमास जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, रवी परामणे, समीर आत्तार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT