ना. शिवेंद्रराजे भोसले  Pudhari Photo
सातारा

Satara District Bank Election | मतांचा विचार करून जागा वाटप व्हावे : ना. शिवेंद्रराजे भोसले

निवडणूक बिनविरोध करण्‍यासाठी प्रयत्‍न

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा बँकेत जिल्ह्यातील दिग्गजांनी काम केले. या निवडणुकीत अनेक इच्छुक असून, महायुतीतील सर्व घटक पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात अर्ज भरले आहेत. महायुतीकडे ९५ टक्के मतदान आहे. मतांचा विचार करून सन्मानजनक जागा वाटप झाले पाहिजे. महायुतीत ज्‍या पक्षाकडे जास्‍त मते आहेत त्‍यांना जास्‍त जागा मिळायला हव्‍यात, अशी स्‍पष्‍ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली.

ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मतांचा विचार करून जागा वाटप झाले तर निवडणूक बिनविरोध होईल. पक्ष वेगळे असले तरी ९५ टक्के मतदान हे महायुतीकडे आहे. जागा वाटप सन्मानकारक झाल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ताकद लावू. प्रत्येक मतदारसंघात सर्वांनी अर्ज भरले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने सर्वत्र उमेदवार दिले असले, तरी समोरासमोर लढण्याची वेळ येणार नाही.

सर्वांनी प्रयत्न केले तर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. महायुतीला मानणारी मतदारसंख्या मोठी आहे. महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याकडे फार फरक पाडणारे मतदान नाही. महायुतीत योग्य तोडगा निघाल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असेही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सातार्‍यात सर्वाधिक मतदार असल्याने जादा जागा मिळाव्‍यात

सातारा तालुक्यात सर्वाधिक एकगठ्ठा मतदान आमच्याकडे आहे. त्यामुळे एखादी जागा जादा मिळावी ही अपेक्षा आहे. जागा मर्यादित आहेत. विकास सोसायट्या जागा हा वेगळा विषय आहे. आरक्षित जागांमध्येच तडजोड आणि जागा वाटप होणार आहे. सोसायट्या आपापल्या ताकदीवर लढायच्या असून, त्याठिकाणी पॅनेल हा विषय नाही. ११ जागांमध्ये उदयनराजेंचीही जागा आहे. त्यामुळे या जागा वाटपात सन्मानकारक तोडगा निघावा, असेही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT