मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले Pudhari File Photo
सातारा

लाटालाटी करणार्‍यांना पोलिस संरक्षण लागते, मला गरज नाही

ना. शिवेंद्रराजे भोसलेंची टोलेबाजी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जनतेच्या पाठिंब्यावर पाचव्यांदा आमदार होऊन मंत्री आणि आता पालकमंत्री झालो. लाटालाटी करणार्‍यांना पोलिस संरक्षणाची गरज असते. मी कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या नसल्याने मला पोलिस प्रोटेक्शनची गरज नाही, असे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना सांगत सुरक्षा व्यवस्था नाकारली. माझ्या ताफ्यात भोंगा वाजवायचा नाही, अशा सक्त सूचना केल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर सभेत सांगितले. लातूरचा पालकमंत्री झालो असलो तरी मी सातार्‍यातच असणार आहे, अशीही टोलेबाजी मंत्री ना. शिवेंद्रराजे यांनी केली.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्री पदावर ना. शिवेंद्रराजे भोसले यांची वर्णी लागल्याने विलासपूर (सातारा) येथे रविवारी सायंकाळी त्यांचा जाहीर सत्कार पार पडला. त्यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने पाचव्यांदा आमदार झालो आणि मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. काही कार्यकर्ते सांगत होते की पोलिस वगैरे असं तसं असतं, पण शेवटी मला माहीत आहे की मंत्रिपद आज आहे तर उद्या नसेल ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊ द्यायच्या नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. जे चुकीचे काही करतात त्यांना पोलिसांच्या संरक्षणाची गरज असते. आपण कुठं काही चुकीचं केलेले नाही. कुणाचं काही काढून घेतलेलं नाही.

कुणाचं काही लाटलेलं नाही किंवा कुठं चोर्‍यामार्‍या केलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला पोलिस प्रोटेक्शनची गरज नाही. जिल्हा प्रशासनाने प्रोटोकॉल म्हणून सुरक्षेसाठी दोन गाड्या दिल्या होत्या. मात्र, त्या दोन्हीही गाड्या मी परत पाठवून दिल्या. त्यावेळी पूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांचा मला फोन आला. साहेब एक गाडीतरी ताफ्यात ठेवा. तुम्ही कामासाठी दौरे करताना लोकं येणार. अडचणी येऊ शकतात, अशी विनंतीही पूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांनी केली होती. जिल्हाधिकार्‍यांना मी सांगितलं की, सुरक्षेसाठी गाडी घेतो पण ती गाडी पुढे जाता कामा नये. ती गाडी मागेच ठेवायची. ती गाडी पुढे गेली आणि सायरन सुरू झाला तर गावातील लोक मला शिव्या देतील. कालपर्यंत बाबा एकटे फिरायचे आज मात्र भोंगा वाजवत फिरतात असं लोक म्हणतील. माझ्यासोबत असताना सातार्‍यासह कुठेही असताना अजिबात गाडीचा सायरन वाजवायचा नाही, अशी सक्त सूचना पोलिसांना दिली. लोकांना त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही, असे बजावले आहे. मला माहित आहे, आपण सिग्नलवर किंवा वाहतूक कोंडीमध्ये असतो अशावेळी भोंगा वाजत आल्यावर आपल्यालाच वैताग येतो मग दुसर्‍यांना कसं वाटत असेल? आपल्यावरूनच दुसर्‍यांचाही विचार करायला हवा. आमदाराचा मंत्री झालो म्हणून मी काहीही करू शकतो, असे नाही. मी मंत्री झालो आणि त्यानंतर आता लातूरचा पालकमंत्री झालो तरी मी सातारकर आहे हे लक्षात ठेवा, असेही ना. शिवेंद्रराजे म्हणाले. यावेळी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, व्यंकटराव मोरे, शशिकांत पारेख, धनश्री महाडिक, बाळासाहेब महामूलकर, रूपाली पवार, नीळकंठ पाटील, रवी पवार, पूनम निकम, पोपटराव मोरे, मालती साळुंखे, सुनील मोरे, राजू मोरे, नगर विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT