सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी साताऱ्याच्या दोन्ही राजेंवर अन्याय झाल्याचा आरोप केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीत अनेक वर्षे कार्यरत असताना सातारा जिल्ह्यावर झालेला अन्याय जयंत पाटलांना त्यावेळी का दिसला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, ‘सातारा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पवारांच्या पुण्यापेक्षाही सातारा जिल्ह्यातून अधिक आमदार निवडून येत होते. मात्र त्यावेळी सांगलीला तीन मंत्रिपदे मिळाली, तर साताऱ्याला एकही मिळाले नाही. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि मी स्वतः राष्ट्रवादीत दीर्घकाळ होतो. त्या काळात आम्हाला योग्य संधी मिळाली नाही. हा अन्याय जयंत पाटलांना तेव्हा दिसला नव्हता का?'
महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, मी स्वतः तसेच पक्षातील इतर इच्छुक नेते सक्रियपणे काम करत आहेत. या निवडणुकीसाठी सुनिल काटकर, पृथ्वीराज देशमुख हेही इच्छुक होते. मात्र, उमेदवारी मिळाली नसतानाही ते उघडपणे भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांचा प्रचार करत आहेत. ज्यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही, त्यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल, असे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जयंत पाटील यांच्यावर टीका करताना शिवेंद्रराजे म्हणाले, 'ते आमचे राजकीय विरोधक असून महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणे हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. मात्र महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करत असून या निवडणुकीत महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल.'
साताऱ्याच्या विकासाबाबतही त्यांनी राष्ट्रवादी नेतृत्वावर टीका केली. ‘दळणवळण व्यवस्था, औद्योगिक विकास आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांबाबत साताऱ्याला कायम दुय्यम वागणूक मिळाली. केवळ रामराजे नाईक-निंबाळकर यांना कृष्णा खोरे विकास महामंडळापुरते मर्यादित मंत्रिपद देण्यात आले. साताऱ्याला राज्यस्तरीय नेतृत्वाची संधी मिळाली नाही, असेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ असून मतदार कोणत्याही अफवांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.