सातारा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू आहे. मात्र, काँग्रेस आणि डावे पक्ष खोटे नॅरेटिव्ह पसरवून तरुणांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. मात्र, या नॅरेटिव्हला बळी न पडता शिक्षक व पदवीधर मतदार महायुतीसोबत राहतील. सत्तेसोबत राहिले तरच त्यांचे सर्व प्रश्न सुटतील. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ शेंद्रे येथील स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात शिक्षक व पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ना. शिवेंद्रराजे भोसले बोलत होते.
यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, उमेदवार डॉ. स्मिता जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, माजी आ. डॉ. दिलीपराव येळगावकर, मदनदादा भोसले, सदाशिवराव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, अजित साळुंखे, तेजस्विनी घोरपडे, सभापती महेश गाडे, सौरभ शिंदे, दिलीप बाबर, ज्ञानदेव रांजणे, रामकृष्ण वेताळ, काका धुमाळ, प्रा. अजिंक्य सगरे, अमित कुलकर्णी, तेजस्विनी दुर्गे, कांचन साळुंखे, हर्षल चिकणे, कामेश कांबळे उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, विरोधकांकडून ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. संविधानिक संस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. आंदोलनांच्या माध्यमातून सत्तापालट करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.
डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार सातारा जिल्ह्याशी आपुलकीचे नाते असलेले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अनेक कुटुंबे जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे ‘पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘पुढारी’ परिवाराशी जिल्ह्याचे गेल्या चार दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सैनिक, ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ‘पुढारी’ने सातत्याने मांडले. प्रसंगी आमच्या विरोधातही परखड भूमिका घेण्याचे धाडस या वृत्तपत्राने दाखवले आहे. या कुटुंबातील सदस्य असलेल्या स्मिता जाधव या पदवीधर मतदारसंघात उमेदवार आहेत, त्यांना विजयी करा, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
ना. शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले, आम्ही अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. जिल्ह्यात आठ आमदार असतानाही मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याला अपेक्षित न्याय मिळाला नाही. जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सत्ता असूनही पक्षाच्या नेतृत्वाने आमचा विचार केला नाही. आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचा गड बनला आहे. भाजपने जिल्ह्याला विविध माध्यमांतून विकासाची संधी दिली आहे. त्यामुळे मतदार भाजपला व पर्यायाने महायुतीला विजयी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.