सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे राजधानी सातार्यात आज, गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आभार मानण्यात येणार आहेत. राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले की, शिवतीर्थ पोवईनाका, सातारा येथे ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार सोहळा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे यांचाही यावेळी सत्कार केला जाणार आहे.
सत्कार सोहळ्याच्या प्रारंभी ना. शिवेंद्रराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा भव्य सत्कार सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 5 ते 6 हजार मराठा बांधव या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्याद़ृष्टीने 11 तालुक्यांतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जोरदार तयारी केली आहे. कला वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी दुपारी जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची नियोजन बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.