सातारा : सोनगाव येथील कचरा डेपोच्या आगीसंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागातील निरीक्षकांना माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळेच कचरा डेपो काही दिवस पेटत होता. त्याचा सर्वांनाच त्रास झाला आहे. कचरा डेपोवर जे कोण ठेकेदार आहेत ती जर नीट कामे करत नसतील तर त्यांचे ठेके रद्द करुन नीट कामे करणाऱ्या नवीन ठेकेदारांची नियुक्ती करा, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
जिल्हा शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरपालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोच्या आगीसंदर्भात बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांना कचरा डेपोला 8 वाजता आग लागल्याचे कळाले होते. मात्र आरोग्य निरीक्षकांने त्याकडे पुर्णत: दुर्लक्ष केले. त्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या टँकरला फोन केल्याची नोंद दुपारी 2 वाजताची आहे. आग लागल्या लागल्या सर्व काही केलं असतं तर एवढी सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. आरोग्य निरीक्षकांना नोटीस देवून चौकशी करुन कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व नगरपालिकेवर आले आहे त्याचा सगळ्यांना त्रास झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. आगीमुळे बरेच नुकसान झाले आहे. त्याठिकाणी ज्या संस्थेला कामे देण्यात आली आहेत ती संस्था काय करत होती? पूर्वी एवढे प्रकल्प राबवूनसुध्दा कचऱ्याचे ढिग कसे निर्माण होतात? हा पण गंभीर विषय आहे. कचरा डेपोवर पुरेपूर या संस्थेमार्फत घनकचऱ्याचे व्यवस्थापनच झालेले नाही. कचरा डेपोच्या आगीची पूर्णपणे चौकशी करावी. जे कोण ठेकेदार आहेत ती जर नीट कामे करत नसतील तर त्यांचे ठेके रद्द करुन नीट कामे करणारे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करावी. मात्र एक चर्चा अशी आहे काही लोक म्हणतात आग लागली तर काही म्हणतात मुद्दामहून आग लावली गेली असेही ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
वारंवार आगीसारख्या घटना घडू नयेत यासाठी इंडस्ट्रीयल फायर हायड्रेनस उभारावे. तसेच 2 लाख लिटरची टाकी बांधून त्या ठिकाणी कायम भरुन ठेवावी. डस्ट्रीयल फायर हायड्रेनस संदर्भात कन्स्लटन्सीकडून कचरा डेपोवर कुठे कुठे आऊटलेट काढायचे तसे बांधून घ्या, अशा सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत. मात्र या ठिकाणी पाईपलाईन करण्यात आली आहे. मात्र ती कचऱ्यात मुजली आहे ते कळत नाही. त्याबाबत दोष कोणाचा आहे. त्यासाठी नगरपालिकेकडे त्याचा आराखडा आवश्यक आहे. नव्याने टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनसाठी बांधकाम करुन ठेवा याबाबत नगराध्यक्ष व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पुढील सुरक्षेच्यादृष्टीने नगरपालिकेने आग बुजवण्याची यंत्रणा त्वरित उभारावी. सोलर पॅनल व अन्य पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यासाठी क्लेम वगैरे केला जाणार असल्याचेही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शाहूनगर, चारभिंती, अजिंक्यतारा किल्ल्यापासून कासला जाण्यासाठी बाहेरच्या बाहेर रिंगरोड काढत आहे. तसेच महादरेवरून जूना मेढा रोड, अंभेदरे, पेढ्याच्या भैराबापासून रस्ता खाली आणला जाणार आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नगरपालिकेने वर्ग केला आहे. मात्र या रस्त्याच्या कामाच्या जमीन हस्तांतरणासाठी सुमारे 20 कोटींचा खर्च आहे. मात्र बांधकाम विभागाच्या एका योजनेत हा रस्ता घेतला असून कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम सुरु होणार आहे. कासमुळे शहरात वाहतूक कोंडी होत होती ती बाहेरच्या बाहेर जावी कारण समर्थ मंदिर, अदालतवाडा रस्त्यांचे रुंदीकरण करता येणार नाही कारण त्या ठिकाणी जुन्या इमारती आहेत फार पाडापाडी करता येणार नाही. मात्र जिथे शक्य आहे त्या ठिकाणी रुंदीकरण केले जाणार आहे. समर्थ मंदिर चौकाचे रुंदीकरण झालेच पाहिजे त्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी दोन जणांची बांधकामे आहेत ती ताब्यात घेवून काढायला लागतील. रिंगरोडचा प्रकल्प हा 100 कोटी रुपयांच्या पुढे जाईल.
वाढे, वडूथ, आरळे, शिवथर ही सर्व गावे रस्त्यावर आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण करता येत नाही. त्याला पर्याय म्हणून बसाप्पाचीवाडी वरुन एक बायपास मार्ग काढण्यासंदर्भात बैठकही झाली आहे. त्याला बहुतांश जणांनी मान्यताही दिली आहे. हा मार्ग पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न येणार आहे. मात्र पूर्वीच्या नकाशावर जे रस्ते आहेत ते धरूनच त्याचा आराखडा संबंधित विभागाने केला आहे. रानमळ्यातून यशोदा कॅम्पसकडे जाण्यासाठी नवीन रस्त्याचे व पुलाचे काम करुन हा रस्ता महामार्गाला जोडला जाणार असून त्याचे काम बांधकाम विभागामार्फत केले जाणार असल्याचे ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
सातारा बसस्थानकाबाबत नव्याने आराखडा
सातारा बसस्थानकाच्या बाबतीत मुंबईला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर बैठक झाली असून महामंडळाने बसस्थानकाचा पुन्हा नव्याने आराखडा केला आहे. प्रशासकीय इमारत बाजूने इन गेट गेले. वाहतूक पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाला हे दाखवा. वाहतूक पोलिसांनाही सूचना केल्या आहेत. हे गेट वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिणामकारक होणार आहे का हे बघा असे सांगण्यात आल्याचे ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.