सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजपाची प्रचंड लाट उसळली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे ठाम प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘भाजप हा केवळ सत्तेसाठी काम करणारा पक्ष नाही, तर विकास, शिस्त आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष आहे. गेल्या काही वर्षांत सातारा जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात उभा राहिला आहे. या विकासकामांची पोचपावती जनतेने वेळोवेळी दिली असून, प्रत्येक निवडणुकीत भाजपावरचा विश्वास अधिक मजबूत होत गेला आहे.’
ना. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा थेट लाभ गावागावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आज सातारा जिल्ह्यात भाजपाचे मजबूत आणि भक्कम संघटनात्मक नेटवर्क उभे राहिले आहे. हे नेटवर्क म्हणजेच भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर जनतेने उमटवलेली विश्वासाची मोहर आहे.’ नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांत भाजपाला सातारा जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले असून हा जनतेचा स्पष्ट कौल आहे, असेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांनी हे सिद्ध केले आहे की सातारा जिल्ह्यातील जनता विकासाच्या राजकारणालाच साथ देते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हा कौल आणखी ठळक आणि निर्णायक स्वरूपात दिसून येईल. विकासाचा हा वारू आता चौखूर उधळणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपाचा विजय कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास ना. शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका हा भाजपच्या नेतृत्वाचा आणि जनतेच्या विश्वासाचा जिवंत पुरावा आहे. जनतेने कुणाच्या हातात विकास द्यायचा आणि कुणाला नाकारायचे, हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे. भाजपचे नेतृत्व किती कर्तबगार आहे, हे आज संपूर्ण राज्य पाहत आहेे. भाजपची ओळख ही शिस्त, नियोजन आणि पारदर्शकतेची आहे. याच शिस्तबद्ध आखणीमुळे जिल्हा परिषदेचे काम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात वेगाने होईल. भ्रष्टाचाराला थारा न देता विकासकामांना गती देण्याचा आमचा निर्धार आहे. ना. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, “ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राबवलेल्या योजनांमुळे आज गावागावांत परिवर्तन दिसून येत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, शाळा, वीजपुरवठा आणि कृषीपूरक योजनांमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत आहे. हा बदल म्हणजे भाजपाच्या विकासाच्या राजकारणाचा थेट पुरावा आहे. ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर सातारा जिल्ह्याच्या भविष्यासाठीची आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरांत जाऊन सरकारच्या विकासकामांची माहिती पोहोचवावी आणि भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकदीनिशी काम करावे.
जिल्ह्यात होत असलेल्या प्रचार सभेला भाजपाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्यामुळे प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपच जिल्हा परिषदेवर वर्चस्व ठेवेल, असेही ते म्हणाले.
दर्जेदार आणि लोकहिताचे काम करु : धैर्यशील कदम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात काम करत असून, त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने अनुभवला आहे. सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचा निर्धार आता केवळ घोषणा न राहता ठोस कृतीतून दिसून येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यात सर्वांगिण, दर्जेदार आणि लोकहिताचे काम केले जाईल. सातारा जिल्ह्याचा विकास अधिक गतीने साधण्याचा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.